“कल्पनेतील राक्षसापेक्षा वास्तवातील राक्षस कमी भयावह असतो.” ही इंग्रजी म्हण परवा एका प्रसंगामुळे पुन्हा आठवली. लहानपणी देव-दानवांच्या आणि राक्षसांच्या गोष्टी ऐकतच आमची पिढी मोठी झाली. राक्षस म्हणजे क्रौर्य, हिंसा आणि भय यांचे मूर्तिमंत प्रतीक, अशी आमच्या मनात प्रतिमा तयार झाली होती. पण जीवनाचा अनुभव जसजसा वाढत गेला, तसतसे लक्षात आले की कल्पनेतील भीती वास्तवापेक्षा अनेकदा अधिक मोठी असते.
परवा एका मित्राच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांचा मुलगा आयटी अभियंता आहे. वार्षिक पंचवीस लाखांचे पॅकेज, घरची विशेष जबाबदारी नाही, पुण्यासारख्या शहरात उत्तम नोकरी—म्हणजे सर्व काही सुरळीत. तरीही तो लग्न करण्यास तयार नव्हता. लग्नाचे वय पुढे सरकत असल्याने त्याच्या वडिलांची चिंता वाढली होती. माझ्या समजावण्याने कदाचित काही फरक पडेल या आशेने त्यांनी मला बोलावले.
मी त्या तरुणाशी सविस्तर संवाद साधला. प्रथम विचारले, “तुझे कोणाशी प्रेमसंबंध आहेत का?” त्याने स्पष्टपणे नकार दिला. मग विचारले, “लग्न न करण्यामागचे कारण काय?”
त्याचे उत्तर एका शब्दात होते—भीती!
“कसली भीती?” असे विचारताच त्याने शंकांची मालिका सुरू केली.
“होणाऱ्या पत्नीने माझ्या आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारली नाही तर? ती भांडखोर निघाली तर? तिचे पूर्वीच्या प्रियकराशी पुन्हा संबंध निर्माण झाले तर? तिने घटस्फोट मागितला तर? पोटगी द्यावी लागली तर? घराचे कर्ज कसे फेडू?”
त्याचे प्रत्येक वाक्य काळजीने भरलेले होते. विशेष म्हणजे, प्रत्येक शंकेमागे त्याने आजूबाजूच्या समाजातील प्रत्यक्ष उदाहरणेही दिली. त्यामुळे त्याची भीती पूर्णपणे निराधार आहे, असे म्हणणे मलाही शक्य झाले नाही.
या प्रसंगानंतर पुण्यातील एका कौटुंबिक समुपदेशक आणि महिला वकिलांचा यूट्यूबवरील एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्येही हाच विषय चर्चिला गेला होता. त्यांनी सांगितले की केवळ तरुणच नव्हे, तर तरुणीही विवाहाबाबत अनेक शंकांनी ग्रासलेल्या आहेत. भावी पती व्यसनाधीन निघाला तर? कौटुंबिक हिंसाचार झाला तर? आर्थिक शोषण झाले तर? सासू-सासऱ्यांची जबाबदारी कशी सांभाळायची? माझ्या करिअरचे काय? माझ्याही आईवडिलांची जबाबदारी तो घेईल का? अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्याही मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली. ही एखाद्या व्यक्तीची किंवा एका कुटुंबाची समस्या राहिलेली नाही. उच्चशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम तरुण-तरुणींमध्ये विवाहाविषयीचा संकोच आणि असुरक्षितता वाढत आहे. परिणामी विवाह उशिरा होत आहेत किंवा अनेकजण विवाहच टाळत आहेत.
या पिढीच्या चिकित्सक वृत्तीचे कौतुक करावे की त्याला अतिरेकी सावधपणा म्हणावा, हा प्रश्न पडतो. आयुष्यातील प्रत्येक निर्णय काही प्रमाणात जोखीम घेऊनच घ्यावा लागतो. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक, शिक्षण किंवा विवाह—कोणत्याही क्षेत्रात शंभर टक्के सुरक्षिततेची हमी मिळत नाही.
जर केवळ संभाव्य संकटांचाच विचार करत राहिलो, तर जीवनातील अनेक सुंदर अनुभवांना आपण मुकू. भीती माणसाचे संरक्षण करते; परंतु तीच भीती निर्णयक्षमता हिरावून घेऊ लागली, तर ती प्रगतीची सर्वात मोठी अडचण ठरते.
विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा करार नसून तो विश्वास, समंजसपणा, संवाद, संयम आणि परस्पर सन्मान यांवर उभा असलेला सामाजिक संस्कार आहे. सर्वच पत्नी वाईट नसतात आणि सर्वच पती अत्याचारी नसतात. समाजात वाईट उदाहरणे आहेत, तसेच अत्यंत यशस्वी, आनंदी आणि आदर्श वैवाहिक जीवन जगणारी असंख्य कुटुंबेही आहेत. दुर्दैवाने, चांगल्या उदाहरणांची चर्चा कमी आणि वाईट घटनांची प्रसिद्धी अधिक होत असल्याने तरुणांच्या मनात भीतीचे सावट गडद होत आहे.
गोष्टीतील राक्षस जितका भयंकर वाटतो, तितका वास्तवातील राक्षस अनेकदा नसतो. आपण कल्पनेत उभे केलेले भयच अनेकदा आपल्याला वास्तवातील आनंदापासून दूर ठेवते.
आज गरज आहे ती नव्या पिढीला अवास्तव भीती नव्हे, तर वास्तववादी विचार, सकारात्मक दृष्टी, परस्पर विश्वास आणि सुदृढ संवाद यांची शिकवण देण्याची. कारण समाजाची सुदृढ कुटुंबव्यवस्था ही केवळ कायद्याने नव्हे, तर विश्वासाने टिकून राहते.
– डॉ. ह. ना. जगताप.
(लेखक महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ असून सेवानिवृत्त प्राचार्य आहेत.)



