आंबोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत भरघोस यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत १४ वर्षे वयोगटात ३५ ते ४० किलो वजनी गटात कॅडेट हन्शल सचिन साटेलकर याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. तर २० ते ३० किलो वजनी गटात कॅडेट हित राकेश धसकर, ३५ ते ४० किलो वजनी गटात कॅडेट शेवोन शानल परेरा यानी द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक पटकावले. १७ वर्षे वयोगटात ५१ ते ५५ किलो वजनी गटात कॅडेट धनुष गोविंद परब याने तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. १९ वर्षे वयोगटात ६६ ते ७३ किलो वजनी गटात कॅडेट चिराग अनिल साळुंखे याने द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक पटकावले.
प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कॅडेट हन्शल सचिन साटेलकर याची आता विभाग स्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली प्रशालेचे क्रीडा प्रशिक्षक दिनेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जुदो स्पर्धेतील विजेते व क्रीडाप्रशिक्षक दिनेश जाधव व मनोज देसाई यांचे संस्थाध्यक्ष सुनील राऊळ, संचालक सेक्रेटरी जॉय डॉन्टस, ऑफिस सेक्रेटरी दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल शाळेचे शिक्षकवृंद, प्रशिक्षक तसेच पालकांनी विजयी संघाचे अभिनंदन केले असून, विभागीय स्पर्धेतही संघाने अशीच दमदार कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास व्यक्त केला आहे.



