घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगची ४५ दिवसांची मुदत कमी करा! : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी,! ; ग्राहकांना तातडीने सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे साकडे.

सावंतवाडी : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा कमी करून ग्राहकांना किमान १५ दिवसांत सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य जावेद खतिब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बांदा माजी उपसरपंच बाळू सावंत, युवा सेना युवा मंडळ अध्यक्ष सिद्धेश कांबळी, योगेश देसाई आदि उपस्थित होते.

सध्या घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ४५ दिवसांची कालमर्यादा लागू असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, अनेक घरांमध्ये या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो. त्यामुळे सध्याची ४५ दिवसांची बुकिंग मर्यादा ग्राहकांसाठी अडचणीची ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका सिलिंडरनंतर पुढील बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक कुटुंबांना लाकूड, कोळसा अथवा अन्य पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या कुटुंबांना बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी गंभीर असून, गॅस वितरण केंद्रांपर्यंत वारंवार जाणे, वाहतुकीचा खर्च करणे, अनेक दिवस प्रतीक्षा करूनही सिलिंडर उपलब्ध न होणे अशा तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचे खतिब यांनी निदर्शनास आणून दिले आहे. ४५ दिवसांच्या कालमर्यादेमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पाच प्रमुख मागण्या

जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात संबंधित गॅस वितरण कंपन्या इंडियन ऑइल, भारत गॅस व एचपी गॅस तसेच जिल्हा पुरवठा यंत्रणेशी समन्वय साधून पुढील उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगची ४५ दिवसांची कालमर्यादा कमी करून १५ दिवसांपर्यंत आणावी.

श्रावण व गणेशोत्सव काळात विशेष सवलत देऊन नागरिकांना आवश्यकतेनुसार सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत.

जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांकडे पुरेसा गॅस साठा उपलब्ध आहे याची खात्री करावी.

गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अतिरिक्त दर आकारणी, कृत्रिम टंचाई व अनियमित वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

ग्रामीण व दुर्गम भागातील गॅस वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष नियोजन करावे.

गॅस हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यावश्यक विषय असून, महिलांच्या आरोग्यापासून कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीपर्यंत त्याचा थेट संबंध आहे. त्यामुळे या मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जावेद खतिब यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles