सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ॲड. अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी (सेज विद्यापीठ) यांच्याकडून कायदेविषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक उल्लेखनीय कामगिरीबद्दल भोसले नॉलेज सिटी परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ॲड. अस्मिता सावंत भोसले यांनी विद्यापीठाच्या विधी व कायदेविषयक अध्ययन शाखेअंतर्गत ‘महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांमधील किशोरवयीन गुन्हेगारीचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर पीएचडीचे संशोधन पूर्ण केले. या संशोधनात दोन्ही राज्यांमधील किशोरवयीन गुन्हेगारीची कारणे, स्वरूप, प्रवाह, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच किशोर न्याय व्यवस्थेचा सखोल तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
संशोधनामध्ये किशोरवयीन गुन्हेगारीवर परिणाम करणारे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक घटक यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर जोखीमग्रस्त युवकांसाठी शिक्षण, मानसिक आरोग्य सहाय्य, कौशल्यविकास आणि प्रभावी पुनर्वसन व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे.
या पीएचडी संशोधनासाठी डॉ. सिमरन सिंग यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच विभागप्रमुख डॉ. सुनील कुमार पांडे यांच्या मार्गदर्शन व शैक्षणिक परीक्षणामुळे संशोधनाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार ॲड. अस्मिता सावंत भोसले यांच्या पीएचडीच्या अंतिम मुलाखतीचा टप्पा २० जुलै रोजी पार पडला. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवीसाठी पात्र घोषित करणारी अधिसूचना जारी केली.
कायदा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ॲड. अस्मिता सावंत भोसले यांच्या या यशामुळे श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संचालक मंडळ, भोसले नॉलेज सिटी परिवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि कायदेविषयक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



