आयुष ओपीडीला विलंब, ५७ कोटींच्या पाणी योजनेतील कथित गैरव्यवहारावरून नगरपरिषदेसमोर धरणे! ; नगरसेवक देव्या सुर्याजींचा प्रशासनाला थेट इशारा, मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसह उच्चस्तरीय चौकशीची मागणी. ; “मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही!”

सावंतवाडी : आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या माध्यमातून सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेली ओपीडी अद्याप कार्यान्वित न झाल्याने तसेच तब्बल ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामातील कथित अनियमितता आणि पाणीपुरवठा विभागातील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी यांनी स्वातंत्र्यदिनीच नगरपरिषद प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले. १५ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन छेडत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.

आयुष मंत्रालयाची ओपीडी तातडीने सुरू करावी, नळपाणी योजनेच्या कामात कसूर करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, अशा विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

“जनतेच्या प्रश्नांना नगरपरिषद न्याय देत नाही”, असा थेट आरोप करत सुर्याजी म्हणाले की, नळपाणी योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. जिल्हाधिकारी नगरपरिषदेत आले असतानाही लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासन नेमके कोणासाठी काम करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून मंजूर झालेली ओपीडी आज सुरू होणे अपेक्षित असतानाही ती अद्याप सुरू झालेली नाही. या संदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर झालेला असतानाही तब्बल तीन महिन्यांपासून कोणतीही ठोस प्रक्रिया झालेली नाही. मुख्याधिकाऱ्यांकडूनच या प्रक्रियेला विरोध होत असल्याचे समजते. या ओपीडीमुळे नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराची सुविधा मिळणार असताना प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुर्याजी यांनी केला.

मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांच्यावर पूर्वी झालेल्या कारवाईचा दाखला देत, “अशा व्यक्तीला संस्थानकालीन पवित्र नगरपरिषदेच्या खुर्चीत आणून बसविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

“महायुतीत असलो तरी जनतेचे प्रश्न सर्वात महत्त्वाचे!”

या आंदोलनाला पाठिंबा देताना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही नगरपरिषद प्रशासनावर निशाणा साधला. नगरपरिषदेचा कारभार बोगस पद्धतीने सुरू असल्याने शहराची ही अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला.

“आम्ही महायुतीत असलो तरी जनतेचे प्रश्न आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सभागृहात जनतेचे प्रश्न मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असा इशारा परब यांनी दिला.

शहरातील दुरावस्थेला नळपाणी योजना आणि गॅस कंपनीकडून करण्यात आलेली कामे कारणीभूत असल्याचे सांगत, प्रशासनाचा गाडा हाकण्यात सत्ताधारी कमी पडत असल्याची टीकाही त्यांनी केली.

केसरकरांची आंदोलनस्थळी भेट; नगराध्यक्षा भोंसले यांची मध्यस्थी

दरम्यान, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनीही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

मात्र, सुर्याजी यांनी आपली भूमिका ठाम ठेवत “मुख्याधिकाऱ्यांना आमच्यासमोर बोलावून घ्या. त्यांनी लेखी स्वरूपात म्हणणे द्यावे. त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्याबाबत विचार करू,” असे स्पष्ट केले.

दुपारपर्यंत मुख्याधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. प्रशासनाच्या वतीने पत्र घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांनाही आंदोलनकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

“मुख्याधिकारी नाहीत, प्रशासकीय अधिकारीही नाहीत; मग नगरपरिषदेचा कारभार नेमका हाकतय कोण?” असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मुख्याधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलनातून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

सर्वपक्षीय नागरिकांचा आंदोलनाला पाठिंबा

या आंदोलनाला सावंतवाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. आंदोलनस्थळी नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, उबाठा शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर, समीर वंजारी, राजू मसुरकर, रमेश सुर्याजी, विनोद सावंत, बाबल्या दुभाषी, अनिकेत पाटणकर, प्रथमेश प्रभू, दिग्विजय मुरगोड, ज्ञानेश्वर सावंत, देवेश पडते, संकल्प धारगळकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलनाच्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर उपस्थित करण्यात आलेले गंभीर आरोप आणि विविध मागण्यांवर आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles