सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे गावातील भरवस्तीमध्ये सुरू असलेल्या वराह पालन व्यवसायामुळे निर्माण होणारी तीव्र दुर्गंधी, ध्वनीप्रदूषण आणि अस्वच्छतेच्या समस्येने पारकर कुटुंबीयांच्या जगण्याचा श्वासच कोंडला आहे. या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत असलेल्या कथित दुर्लक्षाच्या निषेधार्थ योगेश पारकर कुटुंबीयांनी स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी निरवडे ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचे हत्यार उपसले.
भरवस्तीतील या वराह पालन व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असून ध्वनीप्रदूषणामुळेही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. “रहायचे कसे आणि जगायचे कसे?” असा सवाल उपस्थित करत पारकर कुटुंबीयांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप युवा नेते संदीप गावडे यांची उपोषणस्थळी भेट! –
तळवडे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप नेते संदीप गावडे यांनी उपोषणस्थळी भेट देत पारकर कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेत त्यांच्या समस्येची माहिती घेतली.
यावेळी उपसरपंच अर्जुन पेडणेकर, संजय तानावडे, रोहन मल्हार, कृष्णा बांदिवडेकर आणि चिन्मय सावंत उपस्थित होते.
अहवाल स्पष्ट, तरीही कारवाई कुठे?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे यांचे स्पष्ट अहवाल उपलब्ध असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून या समस्येवर ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
प्रदूषण आणि आरोग्याशी संबंधित बाबींचे अहवाल समोर असतानाही प्रशासनाकडून प्रश्नाची दखल घेतली जात नसेल, तर नागरिकांनी दाद मागायची तरी कुठे? असा संतप्त सवाल पारकर कुटुंबीयांनी उपस्थित केला.
निरवडे सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, भरवस्तीतील वराह पालन व्यवसाय तातडीने इतरत्र हलविण्याची मागणी करण्यात आली आहे.
“व्यवसाय हलवा, अन्यथा आंदोलनाची धग वाढणार!”
भरवस्तीतील वराह पालन व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
जोपर्यंत हा व्यवसाय भरवस्तीतून इतरत्र हलविण्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पारकर कुटुंबीयांनी दिला आहे.
स्वातंत्र्यदिनीच ग्रामपंचायतीच्या दारात छेडण्यात आलेल्या या उपोषणामुळे निरवडे गावातील वराह पालन व्यवसाय, ग्रामपंचायतीची भूमिका आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर आता प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



