सावंतवाडी : मिलाग्रीस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यशाची परंपरा कायम राखत आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. ओडिशा येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय स्लिंग शॉट चॅम्पियनशिपमध्ये मिलाग्रीस प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी दुर्गा जाधव हिने आपल्या अचूक नेमबाजी कौशल्याची छाप उमटवत घवघवीत यश संपादन केले.
राष्ट्रीय स्तरावर देशभरातून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये दुर्गाने १२ वर्षांखालील गटात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आगामी फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्लिंग शॉट स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे दुर्गाच्या यशाने केवळ मिलाग्रीस प्रशालेचेच नव्हे, तर सावंतवाडी परिसराचेही नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
लहान वयातच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीला, चिकाटीला आणि खेळातील कौशल्याला मिळालेली पावती मानली जात आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही दुर्गा देशाचे प्रतिनिधित्व करत दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुर्गाच्या या अभिमानास्पद आणि प्रेरणादायी यशाबद्दल मिलाग्रीस प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय फादर रिचर्ड सालढाणा यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय मंचावर चमकलेली दुर्गाची कामगिरी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा इतिहास घडविण्यास सज्ज झाली आहे!



