सावंतवाडी : शहराच्या सीमेवरील टेलिफोन कॉलनी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल तीन बंगले फोडल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टेलिफोन कॉलनीतील काही बंगले बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरांचे दरवाजे व कुलपे तोडून आत प्रवेश केला. एका घरातील बेडरूममधील कपाटे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, घरातील फोन आणि लॅपटॉप जागच्या जागी असल्याचे आढळून आले आहे. मात्र अन्य काही ठिकाणांहून दागिने लंपास करण्यात आल्याचे समोर आले असून दोन दुचाकीही चोरीस गेल्या आहेत.
फॉरेन्सिक टीमकडून ठसे अन् पुराव्यांचा शोध
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांसह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. घरांची पाहणी करून चोरट्यांनी मागे सोडलेले ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सीसीटीव्हीच बंद! चोरट्यांना पोलिसांचा शोध लागणार कसा?
या चोरीच्या घटनेच्या तपासात परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे चोरट्यांच्या हालचालींचा माग काढताना पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
शहराच्या महत्त्वाच्या भागात सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्ही व्यवस्था सक्षम असणे गरजेचे असताना कॅमेरे बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
टेलिफोन कॉलनीत भीतीचे सावट; पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध
एकाच रात्री तीन बंगल्यांना लक्ष्य करण्यात आल्याने टेलिफोन कॉलनीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीचा तातडीने छडा लावून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करून परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चोरट्यांचा हा धुमाकूळ नेमका कुणाचा? एकाच रात्री तीन बंगले फोडण्यामागे टोळीचा हात आहे का? याचा उलगडा आता पोलिसांच्या तपासातूनच होणार असून, परिसरातील नागरिकांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.



