सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना त्यांच्या जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ८० टक्के भरती स्थानिक युवक-युवतींचीच करावी, या विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या भूमिकेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.
दहा हजार शिक्षकांची भरती तसेच जिल्हा संवर्ग भरती पूर्ववत करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी घेतली आहे. ही भूमिका स्थानिक बेरोजगार युवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असे साळगावकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील मोठ्या संख्येने युवक रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, गोवा आदी ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. जिल्ह्यात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने हे स्थलांतर दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या लोकसंख्येवर होत आहे.
विशेषतः सह्याद्रीच्या कड्या-कपारीतील अनेक गावांमध्ये आज तरुणाई जवळपास दिसेनाशी झाली आहे. अनेक गावे आता ‘वृद्धांची गावे’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. घरातील तरुण रोजगारासाठी बाहेर आणि गावात ज्येष्ठ नागरिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या स्थिर ठेवायची असेल, तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
“जिल्ह्यातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य मिळाले पाहिजे. ८० टक्के भरती सिंधुदुर्ग-रत्नागिरीतीलच युवक-युवतींची झाली, तर रोजगारासाठी होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबू शकते. जिल्ह्याची लोकसंख्या टिकवण्यासाठी आणि तरुणाईला आपल्या मातीतच रोजगार देण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांच्या या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे,” असे बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक युवकांना रोजगार, जिल्ह्याची लोकसंख्या स्थिर ठेवणे आणि गावागावातील तरुणाईला पुन्हा आपल्या मातीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, यासाठी जिल्हा संवर्ग भरतीचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनातील आमदार प्रमोद जठार यांच्या भूमिकेकडे सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगार युवकांचे लक्ष लागले आहे.



