सण-उत्सव जल्लोषात साजरे करा, पण शांतता, शिस्त अन् कायद्याचे पालन करून! ; सावंतवाडीत शांतता समितीची बैठक, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांचे नागरिकांना आवाहन.

– ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गोपाळकाला आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन; वाहतूक, सीसीटीव्ही अन् कायदा-सुव्यवस्थेवरही चर्चा

सावंतवाडी : “कोकणातील जनता अत्यंत सजग आहे. विविध धर्मांचे सण, उत्सव आणि परंपरा येथील नागरिक गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरे करतात, हीच कोकणची खरी ताकद आहे. आगामी सण-उत्सवही उत्साहात साजरे करताना शांतता, सलोखा आणि सामाजिक बांधिलकी कायम ठेवावी,” असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी केले.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते. विविध सणांच्या नियोजनासोबतच शहरातील वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही यंत्रणा, पार्किंग, वन-वे वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

ईद-ए-मिलादपासून गणेशोत्सवापर्यंत नियोजन

आगामी काळात होणाऱ्या ईद-ए-मिलादच्या सावंतवाडी शहर व कोलगाव येथील मिरवणुका, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सवाच्या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. सावंतवाडी शहरात सुमारे २० दहीहंडींचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये राजकीय दहीहंडींचाही समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रत्येक उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी आयोजकांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवावा, तसेच उत्सवाच्या वेळी कायदा-सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर! 

शांतता समितीच्या बैठकीत शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न नागरिकांनी ठामपणे मांडला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बंद कॅमेऱ्यांबाबत संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावर पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सावंतवाडी शहरात नवीन बुलेट कॅमेरे बसविण्यासाठी सर्व्हे करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, लोकवर्गणीतून कॅमेरे बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक नियंत्रणासाठी माईक यंत्रणेचाही वापर करण्यात येणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले.

गांधी चौक, बसस्थानकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना –

शहरातील गांधी चौक आणि नगरपालिका बस स्टॉप परिसरातील वाहतूक कोंडी हा विषयही बैठकीत चर्चेत आला. वाहनांमुळे होणारे अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.

माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी आगामी शांतता समितीच्या बैठकींना नगरपालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती असावी, अशी मागणी केली. समाजमंदिरासमोरील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावर नगरपरिषद सभापती मोहिनी मडगावकर यांनी शहरात पार्किंगची व्यवस्था करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

‘वन-वे’चा पर्याय चर्चेत –

शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता वन-वे वाहतूक व्यवस्था लागू करण्याची सूचना दैवज्ञ संघाचे राजेश पनवेलकर यांनी केली. यावर नगरपालिका स्तरावर वन-वेबाबत कार्यवाही सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी सांगितले.

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नागरिक, व्यापारी, नगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईची मागणी –

पत्रकार सीताराम गावडे यांनी वाहनांना लावण्यात येणाऱ्या काळ्या काचांबाबत प्रश्न उपस्थित केला. अशा वाहनांवर कारवाई केल्यास संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि गुन्हेगारीला आळा बसण्यास हातभार लागेल, अशी मागणी त्यांनी केली.

माजी नगरसेवक अफरोज राजगुरू यांनी शहराच्या बाहेरील वाड्यांमध्ये मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची सूचना केली. पालकांनीही आपल्या मुलांच्या हालचालींकडे लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

गणेशोत्सवापूर्वी सर्व विभागांची संयुक्त बैठक –

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. उत्सव काळात वाहतूक, वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व बाबींचे नियोजन आधीच करण्यात यावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

सलोखा हीच सावंतवाडीची ओळख

बैठकीस माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, पत्रकार सीताराम गावडे, पत्रकार अभिमन्यू लोंढे, नगरपरिषद सभापती मोहिनी मडगावकर, सीए चिन्मय रानडे, सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते बावतीस फर्नांडिस, ॲड . नकुल पार्सेकर, हिदायतुल्ला खान, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, दैवज्ञ संघाचे राजेश पनवेलकर तसेच पोलीस हवालदार अमित राऊळ आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles