सावंतवाडी : कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासोबतच स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली व आरोग्य उपकेंद्र कलंबिस्त यांच्या संयुक्त विद्यमाने कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘कुष्ठरोग आजार : समज-गैरसमज’ आणि ‘परिसर स्वच्छता’ या विषयांवर घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माता-पालकांसाठी विद्यार्थ्यांचा आहार, आरोग्य व निरोगी जीवनशैली याबाबत विशेष मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामीण भागात उल्लेखनीय वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घोडे यांचा कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजित जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

चित्रकला स्पर्धेतील लहान गटात कु. श्रद्धा सचिन नेवगी (इयत्ता ६ वी) हिने प्रथम, तर तनिष्क दीपक जाधव (इयत्ता ६ वी) याने द्वितीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात कु. विजया विश्वनाथ मेस्त्री (इयत्ता १० वी) हिने प्रथम, तर कु. राधिका रमाकांत मेस्त्री हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
निबंध स्पर्धेच्या लहान गटात कु. खुशी शिवराम धुरी (इयत्ता ६ वी) हिने प्रथम, तर कु. काव्या रवींद्र तावडे (इयत्ता ६ वी) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. मोठ्या गटात कु. श्रुती गजानन राऊळ (इयत्ता १० वी) हिने प्रथम, तर कु. कीर्ती एकनाथ राऊळ (इयत्ता ८ वी) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना आरोग्य विभागाच्या वतीने प्रमाणपत्रे व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. अश्विनी घोडे यांनी विद्यार्थ्यांसह माता-पालकांना दैनंदिन आहाराचे महत्त्व, पोषणमूल्ये आणि उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मधुमती सावंत, मुख्याध्यापक अभिजित जाधव, शिक्षक किशोर वालावलकर व विनिता कविटकर यांनी आहार-विहाराच्या योग्य सवयी, वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करत उपस्थितांशी संवाद साधला.
कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी मधुमती सावंत, आरोग्य सहाय्यक रोशन सापळे, आरोग्य सेवक तेरसे, कलंबिस्त ग्रामविकास अधिकारी केशव पावरा, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया राऊळ, ज्येष्ठ शिक्षक धनराज सजगुरे, विनिता कविटकर यांच्यासह माता-पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभारप्रदर्शन शिक्षक किशोर वालावलकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व लेखनकौशल्याला व्यासपीठ देतानाच आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविणारा हा उपक्रम ठरला.



