मोती तलावात मानाचा सुवर्ण नारळ अर्पण! राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते पूजन!; नारळी पौर्णिमेच्या परंपरेला सावंतवाडीत उजाळा.

सावंतवाडी : नारळी पौर्णिमेच्या मंगलमय पर्वानिमित्त सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाने पुन्हा एकदा पारंपरिक श्रद्धा, संस्कृती आणि राजेशाही परंपरेचा मनोहारी संगम अनुभवला. सालाबादप्रमाणे सावंतवाडीकरांच्या वतीने मोती तलावाला मानाचा सुवर्ण नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला.

सावंतवाडी पोलीस ठाण्यातून प्रथेप्रमाणे मानाचा नारळ ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मोती तलावाकडे आणण्यात आला. तलावाच्या काठावर सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते सुवर्ण नारळाचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर मानाचा सुवर्ण नारळ मोती तलावाच्या जलराशीत अर्पण करण्यात आला.

नारळ तलावात अर्पण होताच उपस्थित युवकांमध्ये तो मिळविण्यासाठी उत्साहाची लाट उसळली. अनेक युवकांनी तलावाच्या पाण्यात उड्या घेत नारळ जमा करण्यासाठी चुरस केली. या पारंपरिक सोहळ्याने मोती तलावाचा परिसर काही काळ जल्लोषाने दुमदुमून गेला.

दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असणाऱ्या या सोहळ्याला यंदा मात्र तुलनेने गर्दीचे प्रमाण काहीसे कमी दिसून आले. असे असले तरी राजघराण्याची परंपरा, पोलिसांची शिस्त आणि सावंतवाडीकरांची सांस्कृतिक नाळ यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

या प्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, सभापती आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, नगरसेविका नीलम नाईक, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ, श्री. गवस, पोलीस श्री. धोत्रे, आबा पिळणकर, श्री. लोंढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐतिहासिक मोती तलावाच्या साक्षीने पार पडलेला हा सुवर्ण नारळ अर्पण सोहळा म्हणजे सावंतवाडीच्या जपलेल्या परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाची पुन्हा एकदा झालेली दिमाखदार प्रचिती ठरली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles