मुक्ताई ॲकेडमीच्या बुद्धिबळपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी! ; विघ्नेश, प्रज्वल, मोहिशा, यश, अथर्व यांची चमक! वेंगुर्ल्यातील कै. महेश परब स्मृती चषक स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथे आयोजित **कै. महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याची आणि खेळातील कौशल्याची शानदार झलक दाखवत तब्बल पाच पारितोषिकांवर नाव कोरले. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड येथील मुक्ताई ॲकेडमीच्या तब्बल २७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

१० वर्षांखालील वयोगटात विघ्नेश अंबापूरकर याने द्वितीय, प्रज्वल नार्वेकर याने चतुर्थ, तर मोहिशा जाधव हिने पंचम क्रमांक पटकावला. तर १३ वर्षांखालील वयोगटात यश सावंत याने तृतीय, तर अथर्व वेंगुर्लेकर याने पंचम क्रमांक मिळवत मुक्ताई ॲकेडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सहा वर्षांच्या दिव्यांकाचीही दमदार कामगिरी!

स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली ती सावंतवाडीची अवघ्या सहा वर्षांची दिव्यांका नार्वेकर आणि देवगडचा सहा वर्षांचा आकाश वाटवे. स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू असतानाही दोघांनीही सहाही राऊंडमध्ये उत्तम खेळ करत साडेतीन गुणांची कमाई केली. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड येथील सहभागी विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यांच्या उत्साहाला आणि मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी खेळाडूंनाही मेडल व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

या वेळी विद्यार्थ्यांसोबत प्रशिक्षक व राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर तसेच मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर उपस्थित होते.

मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, बुद्धिबळ क्षेत्रात भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles