सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवरून आज पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ‘उपजिल्हा रुग्णालयात २० डॉक्टर असल्याचा दावा केला जातो, मग ते प्रत्यक्ष कुठे आहेत? ट्रॉमा केअर युनिट असल्याचे सांगितले जाते, मग ते नेमके कुठे आहे?’ असा थेट सवाल स्वातंत्र्यसैनिक अण्णा केसरकर यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांच्यासमोर उपस्थित केला. या प्रश्नांवर डॉ. रेड्डी काही काळ निःशब्द झाले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची प्रतीक्षा करत रुग्ण व त्यांचे नातेवाईक ताटकळत बसल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. ऑर्थोपेडिक डॉ. निखिल अवधूत कुठे आहेत? असा प्रश्न अण्णा केसरकर यांच्यासह उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. त्यावर संबंधित डॉक्टर परीक्षेच्या तयारीसाठी गेले असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
मात्र, ‘आम्ही इतका वेळ डॉक्टरांची वाट पाहत बसलो आहोत; डॉक्टर उपलब्ध नसतील तर साधी माहिती तरी आम्हाला का दिली जात नाही? विनाकारण रुग्णांना ताटकळत ठेवण्याला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला. डॉक्टर अधिकृत रजेवर असतील तर त्याची माहिती रुग्णालयात स्पष्टपणे का दिली जात नाही, असा प्रश्नही केसरकर यांनी उपस्थित केला.
न्यायालयात २० डॉक्टर, मग रुग्णालयात किती?
आरोग्य प्रशासनाकडून उच्च न्यायालयात उपजिल्हा रुग्णालयात २० डॉक्टर उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष रुग्णालयातील परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप करत केसरकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
‘न्यायालयात दाखल केलेल्या माहितीतील २० डॉक्टर प्रत्यक्ष कुठे आहेत, हे दाखवा. ट्रॉमा केअर युनिट असल्याचे सांगता, तेही प्रत्यक्ष दाखवा. जर सक्षम ट्रॉमा केअर युनिट आहे, तर रुग्णांना वारंवार बांबुळी, गोवा येथे का पाठवावे लागते?’ असा सवाल त्यांनी केला.
साध्या फ्रॅक्चरच्या रुग्णालाही बाहेर पाठवले जात असेल, तर या ट्रॉमा केअर युनिटचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर सी-आर्म मशीन उपलब्ध झाल्यानंतर हाडांच्या शस्त्रक्रिया सुरू करता येतील, असे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.
इमारत कुठे उभी करणार? मशिनरी ठेवणार कुठे?
रुग्णालयाच्या प्रस्तावित बांधकामावरही केसरकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला असून, सध्याच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पुढील बांधकाम करता येणार नसल्याचे समोर आले आहे. मग नवीन रुग्णालयाचे बांधकाम नेमके कुठे होणार? असा सवाल त्यांनी केला.
आरोग्य संचालकांनी चार ते आठ आठवड्यांत आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे. मात्र ‘मशिनरी आणणार आहात, पण ती ठेवणार कुठे? सध्याची जागाच रुग्णालयासाठी अपुरी पडत आहे,’ असा टोला केसरकर यांनी लगावला.
त्यामुळे न्यायालयात मांडली जाणारी माहिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘दोन दिवसांनी पुन्हा येतोय, तेव्हा पूर्ण हिशेब द्या!’
आरोग्य व्यवस्थेचा हा प्रश्न केवळ कागदोपत्री आश्वासनांनी सुटणार नसल्याचे सांगत अण्णा केसरकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला.
‘दोन दिवसांनी मी पुन्हा उपजिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहे. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, ट्रॉमा केअर युनिट, मशिनरी आणि प्रस्तावित बांधकामाबाबतची संपूर्ण माहिती द्यावी. काही अडचणी असतील तर त्या स्पष्टपणे सांगा. त्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू; मात्र आरोग्य प्रशासनाने वस्तुस्थिती लपवू नये,’ असे आवाहन त्यांनी केले.
रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही, तर प्रसंगी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशाराही केसरकर यांनी दिला.
यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पालकर यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.



