बांदा : कथा केवळ ऐकवायची नसते, तर ती आपल्या शब्दांच्या जादूने जिवंत करायची असते… आवाजातील चढ-उतार, भावभावनांची गुंफण आणि प्रभावी सादरीकरणातून चिमुकल्या कथाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. बांदा येथील नट वाचनालयात आयोजित विष्णू नारायण गावकर पुरस्कृत, त्यांच्या पत्नी (कै.) सौ. विजया गावकर व मुलगा (कै.) बिपिन गावकर यांच्या स्मरणार्थ बालवाचक कथाकथन स्पर्धेत लहान गटात कनिका आनंद कोटणीस (जि. प. शाळा इन्सुली नं. १०), तर मोठ्या गटात सार्थक राणे (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपली कथाकथनाची छाप उमटवली.
वाचनाची गोडी आणि कथाकथनाची कला बालमनात रुजावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इयत्ता तिसरी ते चौथीच्या लहान गटात १४, तर इयत्ता पाचवी ते सातवीच्या मोठ्या गटात १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या सादरीकरणातून कथांना जणू शब्दरूपाने रंगमंचावर उभे केले.
लहान गटात माही तवटे (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) हिने द्वितीय, तर आत्रेया आचार्य (कळसुलकर स्कूल, सावंतवाडी) हिने तृतीय क्रमांक मिळविला. रूही पालव (जि. प. शाळा इन्सुली नं. ६) व उत्तम कोंडूसकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
मोठ्या गटात ईश्वरी साटेलकर (मळगाव हायस्कूल) हिने द्वितीय, तर अस्मि आईर (दिव्यज्योती इंग्लिश स्कूल, डेगवे) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. अनिका राऊळ (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) व लीला बोर्डेकर (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.
नट वाचनालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून तसेच स्मृतिचित्रास पुष्पहार अर्पण करून दिवंगतांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, शंकर नार्वेकर, विशाखा गावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अन्वर खान तसेच परीक्षक चंद्रकांत सावंत उपस्थित होते. सहसचिव हेमंत मोर्य यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सचिव राकेश केसरकर यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक करताना स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला.
स्पर्धेतील विजेत्या व गुणवंत बालकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या गौरवामुळे बालवाचकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर त्यांच्या कथाकथनातील आत्मविश्वासाला नवी उभारी मिळाली.
कार्यक्रमास प्रवीण परब, गुरुनाथ नार्वेकर, नेत्रा राणे, माधुरी गवस, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, अमिता परब यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश केसरकर यांनी केले.

फोटो ओळ :
बांदा येथील नट वाचनालयात आयोजित कथाकथन स्पर्धेतील विजेत्या बालकांसोबत उपस्थित मान्यवर.



