सावंतवाडी : ‘संतांच्या सहवासात मनाला समाधान, विचारांना दिशा आणि जीवनाला खरा आनंद मिळतो,’ असा अध्यात्मिक संदेश देत गुरुमाऊली शोभाताई यांनी भक्तांना भक्ती, सत्संग आणि परमार्थाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. संसार आणि प्रपंचाचा त्याग न करता योग्य विचार, संतवचनांचे आचरण आणि परमार्थाची वाट धरावी, असा उपदेश त्यांनी केला.
सावंतवाडी येथील काडसिद्धेश्वर भवनातील प.पू. श्री. काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या मठात मंगळवारी श्रावण सप्ताह सांगता व ‘दासबोध’ वाचन समाप्ती सोहळा अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. श्रावण मासाच्या प्रारंभापासून सुरू असलेल्या या सप्ताहात काकड आरती, भजन, प्रवचन आदी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुमाऊली शोभाताई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने मठ परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला. शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी प्रवचनातून गुरुमाऊली शोभाताई यांनी ‘दासबोध’ या ग्रंथाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, “दासबोध म्हणजे दासांसाठी समर्थ रामदासांनी केलेला बोध. गुरू-शिष्य संवादाच्या माध्यमातून समर्थांनी भक्तीमार्गाची दिशा दाखवली आहे. या ग्रंथात नवविधा भक्तीचा मार्ग स्पष्ट करण्यात आला आहे.”
“संतांकडे आनंदाच्या लहरी असतात. त्यामुळे संतांच्या सानिध्यातच खरा आनंद अनुभवता येतो. ‘सदा संतांपाशी जावे’ अशी शिकवण प.पू. श्री. वासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी दिली आहे. सत्संगातून निजबोधाची प्राप्ती होते. संत हे आनंदाचे स्थळ असून शिष्याच्या अंतःकरणात तो आनंद स्वीकारण्याची तत्परता असली पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
गुरू हा शिष्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञान गुरूकडून समजून घेत जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगताना गुरुमाऊलींनी प.पू. काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिकवणीचीही आठवण करून दिली.
“काडसिद्धेश्वर महाराजांनी केवळ उपासताप करण्याचा किंवा संसाराचा त्याग करण्याचा संदेश दिला नाही. संसारात राहून, प्रपंच सांभाळत योग्य विचार करावा, परमार्थाची वाट धरावी आणि संतवचनांचे पालन करावे, हीच त्यांची शिकवण होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संतपरंपरेतील भक्तीमार्गाचा संदर्भ देताना गुरुमाऊली म्हणाल्या, “ज्याचा सखा हरी, त्याच्यावर सर्व विश्व प्रेम करते. संत जनाबाई, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांनी अखंड विठ्ठलनामाचा ध्यास घेतला आणि भक्तीचा मार्ग समाजाला दाखवला. त्यांच्या भक्तीची परंपरा आजही अखंड सुरू असून लाखो वारकरी दरवर्षी पायी वारी करत पंढरीची वाट धरतात.”
श्रावण सप्ताहाच्या सांगतेनिमित्त मठात दिवसभर भक्तिमय वातावरण होते. आरती, भजन, प्रवचन आणि दासबोध वाचनाने परिसरात आध्यात्मिक ऊर्जा संचारली होती. कार्यक्रमाच्या अखेरीस शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत **‘श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय’**च्या जयघोषात या भक्तिमय सप्ताहाची सांगता केली.



