सावंतवाडी : आगामी राजकीय वाटचालीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदलांना वेग दिला असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटकपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून उबाठा शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार म्हणून बाळा गावडे यांचे नाव चर्चेत होते. त्यामुळे त्यांच्या नव्या नियुक्तीने सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक जबाबदारी बाळा गावडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात सावंतवाडी मतदारसंघात उबाठा शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक आक्रमकपणे करण्याचे आव्हान गावडे यांच्यासमोर असणार आहे.
बाळा गावडे यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडीच्या राजकीय मैदानात उबाठा शिवसेनेला नवा चेहरा आणि नवी ऊर्जा मिळणार का?, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या गावडे यांच्याकडे आता मतदारसंघाच्या संघटनाची सूत्रे आल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील संघटनेची नवी टीम सज्ज!
सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्तेपदी डॉ. जयेंद्र परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुखपदी संजय गावडे, वैभववाडी उपजिल्हाप्रमुखपदी लक्ष्मण रावराणे, दोडामार्ग उपजिल्हाप्रमुखपदी रामराव उर्फ चंदन गावकर यांची निवड करण्यात आली आहे.
वैभववाडी उपजिल्हा संघटकपदी वसंत खानविलकर, दोडामार्ग उपजिल्हा संघटकपदी लक्ष्मण आयनोडकर, मालवण उपजिल्हा संघटकपदी विनोद सांडव यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तालुका पातळीवर कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, वैभववाडी तालुका संघटक रमाकांत मोरे, सावंतवाडी तालुका संघटक निशांत तोरस्कर, वेंगुर्ले तालुका संघटक विजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कुडाळ उपतालुका संघटकपदी राजेश टगसाळी आणि ओबीसी सेल कुडाळ तालुका संघटकपदी नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडीच्या राजकारणात ‘बाळा’ गावडेंच्या नव्या भूमिकेकडे लक्ष
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीच्या शर्यतीत चर्चेत राहिलेले बाळा गावडे आता विधानसभा मतदारसंघ संघटक म्हणून संघटन उभारणीची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात त्यांची भूमिका आगामी काळात निर्णायक ठरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मातोश्री’ने सोपविलेली जबाबदारी… सावंतवाडीच्या रणांगणात नव्या संघटनबांधणीची तयारी! आता बाळा गावडे या नव्या जबाबदारीतून उबाठा शिवसेनेला किती बळकटी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



