आरोस : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेतील अंतर कमी व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोस व शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सोमवारी (दि. ७ सप्टेंबर २०२६) आरोस बाजार येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिक्षणाच्या वाटेवर सायकलचे चाक फिरले आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला! शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा. श्री. सच्चिदानंद जगन्नाथ परब ऊर्फ संजू परब यांच्या शुभहस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा. श्री. किशोरजी अशोक पाटकर यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मा. श्री. महेश परब यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, त्यांचा वेळ आणि श्रम वाचावेत तसेच शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, या उद्देशाने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
गरजू विद्यार्थ्यांच्या हातात सायकल देणे म्हणजे केवळ प्रवासाचे साधन देणे नव्हे, तर त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना पंख देणे होय, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह या सामाजिक उपक्रमाचे खरे यश अधोरेखित करणारा ठरला.
या कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक श्री. विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू मुळीक, शंकर नाईक, बाळा परब, श्री. अशोक आंगचेकर, श्री. महेश परब यांच्यासह आरोस पंचक्रोशीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



