पुणे / सिंधुदुर्ग : ग्रामीण भागातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सौ. सुमेधा सावळ मंडम यांच्या शैक्षणिक कार्याची दखल आता थेट राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वीच्या ‘शारीरिक शिक्षण व निरामयता’ या विषयाच्या पाठ्यपुस्तकाचे सूक्ष्म समीक्षण करून अधिकृत अभिप्राय नोंदविण्यासाठी सौ. सुमेधा सावळ मंडम यांची राज्यस्तरीय समीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
बालभारतीच्या वतीने त्यांना पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्रातून ही निवड स्पष्ट झाली आहे. नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम २०२५ (मुद्दा पत्र) यावर आधारित इयत्ता पाचवीच्या शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम सुरू असून, या पाठ्यपुस्तकाच्या मसुद्याचे बारकाईने परीक्षण करून आवश्यक सूचना व अभिप्राय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या निरामय भविष्यासाठी समीक्षणाची जबाबदारी
बालभारतीच्या नियोजित समीक्षण सत्रात सहभागी होऊन पाठ्यपुस्तकातील आशय, मांडणी, शैक्षणिक उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचे परीक्षण करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्या बजावणार आहेत. शारीरिक शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, दिनचर्या, क्रीडा आणि निरामय जीवनशैली यांसारख्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित विषयांचे प्रभावी प्रतिबिंब पाठ्यपुस्तकात उमटावे, यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

सावंतवाडी तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण!
डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, बांदा येथे कार्यरत असलेल्या सौ. सुमेधा सावळ मंडम यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे.

एका ग्रामीण भागातील शिक्षिकेवर राज्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेत समीक्षक म्हणून विश्वास ठेवला जाणे, ही बाब सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी विशेष अभिमानाची मानली जात आहे.
‘बालभारती’सारख्या राज्यस्तरीय संस्थेच्या पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण कामगिरी ठरली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सावंतवाडी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.



