सावंतवाडी : भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीकडे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक रणनीती, बूथ पातळीवरील बांधणी, विविध उपक्रमांचे नियोजन आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
बैठकीस जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य तसेच विविध आघाड्या व मोर्चांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक न ठरता आगामी राजकीय समीकरणे आणि पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा निश्चित करणारी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींनाही वेग आला असताना भाजपची ही कार्यकारिणी बैठक होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संघटन मजबूत करण्यापासून आगामी आव्हानांना सामोरे जाण्यापर्यंतचा ‘रोडमॅप’ या बैठकीत निश्चित होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘संकल्प संघटन विस्ताराचा, निर्धार विजयाचा!’
बुधवारच्या बैठकीत भाजपची पुढील रणनीती ठरणार असल्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.



