नक्षत्राच्या ‘स्मॅश’ने गाठला विभागीय टप्पा!, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या नक्षत्रा जावकरची जिल्हास्तरीय टेबल टेनिसमध्ये प्रभावी कामगिरी! ; विभाग स्तरासाठी निवड.

मालवण : वेगवान चेंडूवर अचूक नियंत्रण, आक्रमक फटक्यांची आतषबाजी आणि आत्मविश्वासपूर्ण खेळीच्या जोरावर नक्षत्रा परेश जावकर हिने टेबल टेनिसमध्ये दमदार कामगिरी करत विभागीय स्तरावर झेप घेतली आहे. तिच्या या यशामुळे स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

क्रीडा व युवा संचलनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी जय गणेश स्कूल, मालवण येथे १९ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. नक्षत्रा परेश जावकर हिने आपल्या खेळातील कौशल्य, चपळाई आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर प्रभावी खेळी साकारली. तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

नक्षत्राच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण जी. ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नक्षत्राच्या या यशात सौ. स्नेहा चंद्रशेखर बर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तिच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, विभागीय स्तरावरही नक्षत्रा आपल्या खेळाची चमक दाखवेल, असा विश्वास महाविद्यालय परिवाराने व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles