सावंतवाडी : वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि विचारशक्तीला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या कु. जान्हवी विश्वास पाटील (इयत्ता १० वी) हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाची छाप उमटवत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे RPD प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, तिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने ८ सप्टेंबर २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथे जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, त्यांच्या विचारांचे मंथन घडवून आणणे आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, हा या मेळाव्यामागील प्रमुख उद्देश होता.
या मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत ‘भारतीय ऊर्जाक्षेत्रे २०४७ – संधी आणि आव्हाने’ या विषयावर कु. जान्हवी पाटील हिने अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत विचार मांडले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला परीक्षकांची दाद मिळाली आणि तिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे यश संपादन केले.
‘RPD‘ च्या यशपर्वात आणखी एक मानाचा तुरा!
जान्हवीच्या या उज्ज्वल यशाबद्दल तसेच RPD प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल तिचे, पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत तसेच सर्व संस्था सदस्यांनी जान्हवीचे अभिनंदन करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, उपप्राचार्य श्रीमती एस. आय. कांबळे, पर्यवेक्षक श्री. एन. जी. मुठे, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ यांनीही तिच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
⭐ जिल्ह्यात द्वितीयची मोहोर; आता विभागस्तरावर RPDची ‘जान्हवी’ सज्ज!
ज्ञान, विज्ञान आणि वक्तृत्वाची त्रिवेणी साधत जान्हवीने मिळवलेले हे यश RPDच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधोरेखित करणारे ठरले आहे.



