विज्ञानाच्या रंगमंचावर उमटला समाजजागृतीचा सूर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘विज्ञान आणि समाज’ राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाची रंगत! ; मळगाव इंग्लिश स्कूल अव्वल, मदर क्विन्स द्वितीय तर कळसुलकर हायस्कूल तृतीय.

सावंतवाडी : विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील प्रयोग नव्हे, तर समाजाच्या जीवनाला दिशा देणारी परिवर्तनाची शक्ती आहे, याची प्रचिती देत ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावरील राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ ची तालुकास्तरीय स्पर्धा स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये उत्साह, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीवेच्या वातावरणात दिमाखात पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या अभिनयातून विज्ञानाचे विविध पैलू, सामाजिक प्रश्न आणि जनजागृतीचे संदेश रंगमंचावर प्रभावीपणे साकारले गेले. त्यामुळे विज्ञान, समाज, कला आणि नाट्य यांचा सुरेख मिलाफ घडविणारा हा नाट्योत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक तथा प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. गट समन्वयक तथा केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी. जी. काकतकर, सावंतवाडी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गावडे, कोलगावचे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे, विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा गावडे, सावंतवाडी बीआरसीच्या प्रतिभा सातार्डेकर, प्रसाद सांगेलकर, आरोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाट्योत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

नाट्यसादरीकरणापूर्वी रुजुल पाटणकर व कमलाकर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाट्यकलेच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ विचार आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे आपली कला सादर करावी, असा संदेश देत त्यांनी सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धेचे नियमही स्पष्ट करण्यात आले.

आठ शाळांच्या कलाकारांनी रंगविला विज्ञानाचा रंगमंच!

सावंतवाडी तालुक्यातील एकूण आठ शाळांमधील विद्यार्थी संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक संघाने विषयाला साजेसा आशय, अभिनय, संवादफेक, सादरीकरणातील आत्मविश्वास आणि सामाजिक संदेश यांचा प्रभावी मिलाफ साधत रसिकांची दाद मिळविली. विद्यार्थ्यांच्या अभिनयातून विज्ञानाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली.

स्पर्धेचे परीक्षण बांदा पानवळ कॉलेजचे एन. डी. कार्वेकर, श्री. यशवंतराव भोसले कॉलेज, चाराठेचे प्रा. अमर प्रभू आणि राणी पार्वती देवी हायस्कूलचे प्रा. मिलिंद कासार यांनी केले. बारकाईने निरीक्षण करून त्यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

मळगावचा अभिनय ठरला सरस!

या रंगतदार स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर मोहोर उमटविली. मदर क्विन्स इंग्लिश हायस्कूलने द्वितीय तर कळसुलकर हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळविला.

विजेत्या तिन्ही संघांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या मळगाव इंग्लिश स्कूलच्या संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, तेथेही यश मिळाल्यास विभागस्तरीय स्पर्धेचा मार्ग खुला होणार आहे. सहभागी अन्य शाळांच्या विद्यार्थी संघांनाही सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

‘नाट्य’ आणि ‘पथनाट्या’तील फरकही विद्यार्थ्यांना उलगडला

समारोपावेळी परीक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाट्य आणि पथनाट्य यांतील मूलभूत फरक स्पष्ट केला. प्रभावी नाट्यसादरीकरणासाठी संवादफेक, देहबोली, आवाजातील चढ-उतार, रंगमंचावरील वावर, विषयाची मांडणी आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा संदेश या विविध बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक जाणिवांना नवी दिशा मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका अमृता सावंत व चैताली वेर्लेकर यांनी केले. स्पर्धेचे समन्वयन सहाय्यक शिक्षिका दीपिका कोरे व शाळेच्या समन्वयक सुषमा पालव यांनी केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, पर्यवेक्षिका निधी सावंत, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी शाळांच्या विद्यार्थी-शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

विज्ञानाला कलेची जोड, समाजजागृतीला नाट्याची धार आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला रंगमंचाची साथ देणारा हा नाट्योत्सव स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीतील एक संस्मरणीय उपक्रम ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles