सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प ! : पालकमंत्री नितेश राणे. ; चिपी विमानतळावर एमटीडीसीचे पर्यटक माहिती केंद्र सुरू.

सिंधुदुर्ग : जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने चिपी विमानतळावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) अधिकृत पर्यटक माहिती केंद्राचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या विशेष उपक्रमामुळे सिंधुदुर्गात हवाई मार्गाने दाखल होणाऱ्या पर्यटकांचे स्वागत अधिक आतिथ्यशील आणि सुनियोजित पद्धतीने होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासाला मोठी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी या केंद्राची आवश्यकता विशद करताना सांगितले की, कोकणच्या समृद्ध निसर्गाची, ऐतिहासिक किल्ल्यांची आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांची ओळख पर्यटकांना थेट विमानतळावरच व्हावी यासाठी हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांना कोणतीही दिशाभूल न होता जिल्ह्याच्या प्रत्येक पर्यटनस्थळाची अचूक माहिती, आवश्यक पॅकेजेस आणि नियोजन एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश असून आगामी काळात एमटीडीसीच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विविध पर्यटन महोत्सवांचे भव्य आयोजन करून स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला बळकटी दिली जाईल.

एमटीडीसीचे दिलीप माने यांनी केंद्राच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकत स्पष्ट केले की, चिपी विमानतळावर उतरणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन संपत्तीशी थेट जोडणारा हा एक विश्वासू दुवा ठरेल. पर्यटकांना निवास व्यवस्थेची खात्रीशीर माहिती, सुरक्षित प्रवासाचे नियोजन आणि स्थानिक संस्कृतीची अचूक माहिती देऊन त्यांचा कोकण दौरा अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय बनवण्यावर एमटीडीसीचा विशेष भर राहणार आहे.
या माहिती केंद्रामुळे केवळ पर्यटकांची गैरसोय दूर होणार नाही, तर स्थानिक गाईड्स, होमस्टे व्यावसायिक, हॉटेलियर्स आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विमानतळावरून मिळणाऱ्या या अधिकृत सेवेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला व्यावसायिक स्वरूप लाभेल आणि जिल्हा पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवी झेप घेईल, असा ठाम विश्वास या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles