सावंतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेची कौन्सिल बैठक सुरू होण्यापूर्वीच सभागृहाबाहेरील उपोषणामुळे वातावरण चांगलेच तापले. श्रेयस मुंज हे सभागृहाबाहेर उपोषणाला बसल्याने शिवसेना नेते संजू परब आक्रमक झाले.
उपोषण सुरू असताना नगर परिषदेची बैठक घेणे योग्य नसल्याची भूमिका घेत संजू परब यांनी प्रशासनासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आधी उपोषणाला बसलेल्या श्रेयस मुंज यांना उठवा; त्यानंतरच कौन्सिलची बैठक सुरू करा,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
नगर परिषद कौन्सिल बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभागृहाबाहेर सुरू असलेल्या या उपोषणामुळे प्रशासनाचीही धावपळ उडाली. बैठकीपूर्वीच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सावंतवाडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, संजू परब यांच्या आक्रमक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपोषणाचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय बैठक सुरू न करण्याच्या भूमिकेवर संजू परब ठाम राहिल्याने नगर परिषद वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



