सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ७२ दिवसांच्या कामाचे तब्बल १७ लाख रुपयांचे बिल, चौकशीची मागणी होताच त्याच बिलाच्या रकमेत झालेली कथित घट, जमा-खर्चाचे रजिस्टर गहाळ होणे आणि लेखापरीक्षणाच्या नावाखाली पुरवठादाराकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पाणीपुरवठा समितीचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
‘आम्ही आवाज उठवला म्हणून १७ लाखांचे बिल थांबले; अन्यथा ते अदा झाले असते!’ असा गंभीर दावा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्या म्हणाल्या की, पाणीपुरवठा विभागाच्या लेखापरीक्षणासाठी पुरवठादाराकडून तब्बल दीड लाख रुपये घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. दुसरीकडे, ७२ दिवसांच्या कामाचे १७ लाख रुपयांचे बिल समितीच्या सभेत नगरसेविकांनी आक्षेप घेतल्यामुळे अदा करण्यात आले नाही. त्यानंतर चौकशीची मागणी होताच याच बिलाची रक्कम १३ लाखांवरून १० लाखांपर्यंत आल्याचा दावा त्यांनी केला. बिलाच्या रकमेत एवढी मोठी तफावत कशी निर्माण झाली? या प्रकरणामागे सूत्रधार कोण? याचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘रजिस्टर गहाळ; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?’
पाणीपुरवठा विभागातील जमा-खर्चाचे रजिस्टर गहाळ झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. रजिस्टर गहाळ झाल्यानंतर त्याबाबत एफ.आय.आर. दाखल करण्यासही विलंब होत असल्याचे नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी सांगितले. हिशोबात मोठी तफावत दिसत असून पुरावेच नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय निर्माण होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
विशेष सभेची मागणी केल्यानंतर हे प्रकार उघडकीस आल्याचे सांगताना, त्या सभेला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपस्थित नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या दोघांच्या उपस्थितीतच संबंधित विषयावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘चोर सोडून संन्यासाला फाशी नको!’
ॲड. सायली दुभाषी यांनी या प्रकरणात केवळ राजकीय जबाबदारी निश्चित करून चालणार नसल्याचे सांगत “चोर सोडून संन्यासाला फाशी चालणार नाही,” अशी भूमिका मांडली. या प्रकरणाला जबाबदार असणारे कर्मचारी, अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांच्यावरही चौकशीअंती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
‘नैतिक जबाबदारी स्वीकारा, अन्यथा रस्त्यावर उतरू!’
शिवसेनेचे गटनेते बाबू कुडतरकर यांनी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी तात्काळ नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “आम्ही आवाज उठवला म्हणून बिल अदा झाले नाही. अन्यथा तेवढ्यातच बिल अदा झाले असते. १५ ऑगस्टलाही आम्ही या विरोधात आंदोलन केले,” असे त्यांनी सांगितले.
नगरसेवक देव्या सूर्याजी आणि अजय गोंदावळे यांनीही सभापतींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “पाणीपुरवठा विभागात लाखो रुपयांचे पाणी मुरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील,” असा दावा त्यांनी केला.
अद्याप प्रशासकीय काळातील अनेक विषयांना हात घातलेला नसून मोठ्या आर्थिक अपहाराची शक्यता असल्याचे सांगत, जनतेच्या पैशांचा अपव्यय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, नगराध्यक्षांनी सभापतींचा राजीनामा घ्यावा; अन्यथा जनतेला सोबत घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा स्पष्ट इशारा ॲड. निता सावंत-कविटकर यांनी दिला. नगरपरिषदेच्या इतिहासात अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली. आजही एका व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याची वेळ येणे ही नगरपरिषदेच्या कारभारासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला शिवसेना गटनेते बाबू कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर, पाणीपुरवठा समिती सदस्या नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, नगरसेवक देव्या सूर्याजी, अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.



