मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणकरांच्या मनात आपल्या गावच्या मातीची ओढ निर्माण झाली आहे. याच भावनेला आधार देत गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास मोफत, सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दादर रेल्वे स्थानकातून ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना झाली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या विशेष रेल्वेला कुडाळच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. गणेशोत्सवासाठी आपल्या मायभूमीकडे निघालेल्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद, उत्साह आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण. मुंबईतील धकाधकीचे जीवन मागे सोडून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत गावच्या घराकडे धाव घेणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा प्रवास म्हणजे केवळ रेल्वेचा प्रवास नसून, आपल्या मातीशी पुन्हा नाते जोडणारा भावनिक सेतूच आहे.
या उपक्रमामुळे अनेक कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष रेल्वेच्या रवाना प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कोकणवासीय नागरिक उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
मुंबईत रोजगारासाठी राहणाऱ्या कोकणकरांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांसोबत आणि ग्रामदैवताच्या चरणी जाता यावे, यासाठी करण्यात आलेली ही विशेष व्यवस्था कोकणवासीयांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.



