वेंगुर्ला : वेंगुर्ला येथे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित पंचायत समिती सभापती सिद्धेश परब यांच्या निवासस्थानी अमली पदार्थ आढळल्याच्या वृत्ताने सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करून अमली पदार्थांच्या साखळीची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांनी केली आहे.
“ड्रग्जचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नाही; तो सिंधुदुर्गच्या तरुण पिढीच्या भवितव्याचा, कुटुंबांच्या सुरक्षिततेचा आणि पर्यटन जिल्ह्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे तपासात दोषी आढळणारा व्यक्ती कितीही मोठ्या राजकीय पदावर असो, त्याची गय होता कामा नये,” असा थेट इशारा वंजारी यांनी दिला.
या प्रकरणाकडे काँग्रेस राजकीय सूडबुद्धीने पाहत नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फिरणारे आरोप किंवा छायाचित्रे यांना अंतिम सत्य मानता कामा नये. पुरावे, तपास आणि कायदेशीर प्रक्रियेतूनच सत्य बाहेर आले पाहिजे. मात्र, संबंधित व्यक्तीचे नाव यापूर्वी जुगार, मटका आदी कथित अवैध प्रकारांच्या चर्चेत आल्याचे तसेच काही छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे समोर आले असल्याने, या सर्व बाबींची तपास यंत्रणांनी गांभीर्याने पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘कायदा पक्ष पाहून बदलणार आहे का?’
“भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा अन्य कोणताही पक्ष—कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. सत्तेची खुर्ची तपासासाठी कवच ठरू नये,’ असे वंजारी यांनी सुनावले.
तपासात दोष सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्ती कितीही मोठ्या राजकीय पदावर असली तरी कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. अमली पदार्थांचा स्रोत कुठे आहे, पुरवठा कोण करतो, या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे आणि आर्थिक व्यवहार कोणामार्फत होतात, याचा तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
पालक मंत्री नितेश राणेंच्या भूमिकेचे काँग्रेसकडून स्वागत
पालकमंत्री नितेश राणे यांनी ड्रग्ज, अमली पदार्थ, मटका-जुगार आणि अन्य अवैध धंद्यांविरोधात घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. हीच भूमिका कोणत्याही पक्षाचा विचार न करता कायम ठेवली आणि सत्तेतील किंवा राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली, तर काँग्रेस त्याचे स्वागत करेल, असेही साक्षी वंजारी यांनी स्पष्ट केले.
‘भावी पिढीपेक्षा राजकारण मोठे नाही!’
संबंधित पदाधिकाऱ्याच्या पदाबाबत नैतिक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करताना वंजारी यांनी संबंधित पदाधिकाऱ्याने पदाचा राजीनामा द्यावा, तसेच त्यांच्या पत्नीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यत्वाबाबतही संबंधित पक्ष नेतृत्वाने नैतिकतेच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.
“भावी पिढीपेक्षा राजकारण मोठे नाही. दहशतवादावर बोलणारे आमदार आता या प्रकरणात नैतिक जबाबदारी निश्चित करून राजीनामा घेणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘सिंधुदुर्गची ओळख ड्रग्जच्या जिल्ह्याची होऊ देणार नाही’
सिंधुदुर्ग हा पर्यटनासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याची ओळख ड्रग्ज, मटका किंवा अवैध धंद्यांशी जोडली जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे वंजारी यांनी नमूद केले.
“आपल्या तरुणांच्या हातात रोजगार, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी संधी असायला हव्यात; अमली पदार्थ नाहीत. एखादा पदाधिकारी आहे म्हणून कारवाईला ब्रेक लागला, तर त्याचा चुकीचा संदेश संपूर्ण जिल्ह्यात जाईल,” असे त्या म्हणाल्या.
‘दबावाला झुकू नका, सत्याच्या मुळापर्यंत जा!’
सिंधुदुर्ग पोलिसांना आवाहन करताना साक्षी वंजारी यांनी “राजकीय दबावाला झुकू नका, कोणत्याही हस्तक्षेपाला बळी पडू नका आणि या प्रकरणाच्या सत्याच्या मुळापर्यंत जा,” असे म्हटले.
दोषी सत्तेतला असो किंवा विरोधकांमधला—कायद्याची गय होता कामा नये. ड्रग्जमुक्त सिंधुदुर्गासाठी काँग्रेसचा लढा कायम सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



