कोल्हापूर/ सावंतवाडी : वैज्ञानिक दृष्टिकोन, अभ्यासपूर्ण विचार आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर राणी पार्वतीदेवी हायस्कूलची (RPD) कु. जान्हवी विश्वास पाटील हिने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याच्या विभागीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले. जिल्हास्तरानंतर विभागस्तरावरही आपल्या वक्तृत्वाची छाप उमटवत जान्हवीने RPD हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, त्यांच्या विचारांचे मंथन घडवून आणणे आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे या उद्देशाने प्रादेशिक विद्या प्राधिकरण तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील मगदूम हायस्कूल, महावीर कॉलेज कॅम्पस येथे विभागीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत इयत्ता दहावीतील कु. जान्हवी विश्वास पाटील हिने ‘भारतीय ऊर्जाक्षेत्रे २०४७ – संधी आणि आव्हाने’ या विषयावर प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर केले. जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविल्यानंतर विभागीय स्पर्धेत तिने आपल्या कामगिरीत आणखी उंच भरारी घेत विभागात प्रथम क्रमांक पटकावला.

आता राज्यस्तरावर RPDचा आवाज घुमणार!
विभागीय स्तरावरील या उल्लेखनीय कामगिरीमुळे जान्हवीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ती कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण RPD परिवाराच्या नजरा जान्हवीच्या राज्यस्तरीय कामगिरीकडे लागल्या आहेत.
जान्हवीला या उल्लेखनीय यशाबद्दल प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी समरजित पाटील, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी, सहाय्यक शिक्षण उपसंचालक डॉ. गणपती कमळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
RPD च्या शैक्षणिक यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा
जान्हवीच्या या यशाबद्दल तिचे पालक, मार्गदर्शक शिक्षक आणि RPD हायस्कूलचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत तसेच संस्थेचे सर्व सदस्य यांनी जान्हवीचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, उपप्राचार्य श्रीम. एस. आय. कांबळे, पर्यवेक्षक श्री. एन. जी. मुठे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, पालक-शिक्षक संघ यांनीही जान्हवीच्या यशाचे कौतुक केले.
जिल्ह्यात दुसरा क्रमांक… विभागात पहिला क्रमांक… आणि आता राज्यस्तराची तयारी! जान्हवीच्या या यशामुळे RPD हायस्कूलच्या शैक्षणिक आणि वक्तृत्व क्षेत्रातील गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.



