सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अलीकडेच शिरोडा येथे गांजा आणि ड्रग्ज हे अमली पदार्थ जप्त करत जिल्हा पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई केली आहे. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उडता पंजाब होण्यापासून वाचवण्यापेक्षा या प्रकरणी राजकारण केले जात आहे ते योग्य नाही. उलट जिल्ह्यातील तरुणाई या विळख्यात अडकत असताना जिल्ह्याचे भविष्य आणि भवितव्य वाचविण्यासाठी अमली पदार्थाच्या मुद्यावरून सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केले आहे.
नुकताच शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश ऊर्फ भाई परब यांच्या शिरोडा येथील घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून ५०४ ग्रॅम गांजा (किंमत सुमारे १५ हजार रुपये) आणि २.२६ ग्रॅम मेथामफेटामाईन पावडर (किंमत सुमारे ३३ हजार रुपये), असा एकूण सुमारे ४७ हजार रुपयांचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला. वेंगुर्ला पोलिसांनी सिद्धेश परब यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि अटक केली आहे. नशामुक्त सिंधुदुर्ग’ अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
हा अमली पदार्थांचा साठा कुणी पुरवला आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेने जिल्हा हादरला असताना आता परब यांना फसवले जात असल्याचा कांगावा करत काहींकडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो योग्य नसल्याचे मत प्रसिद्धी पत्रकातून विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. तर अमली पदार्थांची ही किड एकदिवस आपल्याही घरापर्यंत पोहोचू शकते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यापूर्वी जिल्ह्यात एका तरुणाने अमली पदार्थाच्या प्रकरणातून आपला जीव गमावला आहे. तर यापूर्वी मटका, जुगार आणि गोव्यातील कसीनोत अनेक पिढ्या बरबाद झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई अडकत चालली असताना यातून या पिढीला परावृत्त करताना सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याला वाचविण्याची गरज असल्याचे ताम्हणकर यांनी म्हटले आहे.
शिरोडा प्रकरणात पोलीस योग्य तो तपास करतील यात शंका नाही. पोलिसांना तेवढा वेळही दिला पाहिजे, परंतु या प्रकरणात कोणाला अटक झाली यापेक्षा सिंधुदुर्गचा दुसरा उडता पंजाब होऊ पाहतोय हे अत्यंत धक्कादायक आहे. हे सत्य समोर असताना आता राजकारण करण्यापेक्षा सर्व पक्षीयानी एकत्र येऊन या प्रवृत्ती विरोधात एकत्र लढा देवू असे आवाहन विवेक ताम्हणकर यांनी केले आहे.



