सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये-खांबालवाडी येथील चिमुकली कुमारी गौरी पाटकर हिचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती गावातील युवकांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. गौरीच्या उपचारासाठी आर्थिक मदत करत या युवकांनी ‘आपल्या गावातील लेकरू, आपलीच जबाबदारी’ या भावनेचा प्रत्यय दिला.
गौरीच्या अपघाताची माहिती समजताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्यासह बाबुराव तेंडुलकर, सज्जन तेंडुलकर, सतीश गावकर, श्रीपाद गावकर, धर्माजी पाटकर, संतोष पाटकर आणि निलेश पाटकर यांनी एकत्र येत गौरीच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली.
अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी मोठमोठ्या घोषणांची नव्हे, तर संवेदनशील मनाची आणि तत्पर कृतीची गरज असते, हे या युवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. चिमुकली गौरी लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, आदर्श सरपंच गुणाजी गावडे व गावकऱ्यांकडूनही सदिच्छा व्यक्त होत आहेत.
युवकांनी दाखविलेल्या या माणुसकीच्या संवेदनशील भूमिकेचे परिसरातून कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या या उपक्रमातून गावातील एकोप्याची आणि आपुलकीची भावना अधोरेखित झाली आहे.
‘मदतीचा हात छोटा असला, तरी तो संकटात सापडलेल्या व्यक्तीसाठी मोठा आधार ठरतो’, याचीच प्रचिती वेत्ये-खांबालवाडीतील या माणुसकीच्या कृतीतून आली.



