‘माणुसकीच्या नात्याने… देवदर्शनाच्या वाटेने!’ ; भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांची ‘आनंदयात्रा’. ; अक्कलकोटपासून महालक्ष्मीपर्यंत भक्तीचा मंगल प्रवास!

सिंधुदुर्गनगरी : भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधव-भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘देवदर्शन आनंदयात्रे’ला भक्ती आणि माणुसकीचा सुंदर स्पर्श लाभला. असाल येथे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते या विशेष यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या आणि त्यांनाही श्रद्धास्थळांच्या दर्शनाचा अविस्मरणीय अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन रात्री आणि तीन दिवसांच्या या भक्तिमय प्रवासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ४० दिव्यांग महिला-पुरुषांना विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

या आनंदयात्रेदरम्यान अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, नृसिंहवाडी, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर तसेच आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिराचे दर्शन दिव्यांग बांधवांना घडणार आहे. त्यामुळे श्रद्धेच्या या वाटेवर भक्तीचा गजर आणि आनंदाची अनुभूती घेत हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय पर्व ठरणार आहे.

दिव्यांग बांधवांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची समान संधी मिळावी, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण व्हावेत आणि सेवा, संवेदना, माणुसकी व सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या व्यापक भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘माणुसकीच्या नात्याने… देवदर्शनाच्या वाटेने!’ या भावनेला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेली ही आनंदयात्रा केवळ तीर्थदर्शनाची सहल नसून, दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी आणि त्यांच्या मनाला आनंद देणारी संवेदनशील सेवायात्रा ठरत आहे.

या यात्रेत भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक श्यामसुंदर लोट, कोषाध्यक्ष सुनील तांबे, सहसंयोजक प्रकाश वाघ, देवगड प्रभारी दिक्षा तेली, सावंतवाडी प्रभारी सविता गावडे, सावंतवाडी अध्यक्ष बाबुराव गावडे, मालवण प्रभारी रंजना इंदुलकर, वेंगुर्ले प्रभारी सुनील कांबळी, क्रीडा प्रभारी प्रशांत कदम, शासकीय योजना प्रभारी विजय कदम, कणकवली प्रभारी प्रकाश सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र मेस्त्री यांच्यासह पदाधिकारी आणि ४० दिव्यांग महिला-पुरुष सहभागी झाले आहेत.

विशालभाई परब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची संधी’ हा संदेश अधोरेखित झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles