सावंतवाडी : पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब अडवून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील सांगेली येथील कुंभयाचा व्हाळ येथे लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. ग्रामस्थ, महिला बचत गट, शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सामूहिक सहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील जलसंधारणाला मोठी चालना मिळणार आहे.

जलसंधारणाच्या या उपक्रमात सांगेलीच्या सरपंच लवू रामचंद्र भिंगारे, ग्रामपंचायत अधिकारी लीला वसंत मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य सुमन सांगेलकर, भिकाजी कदम, सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा प्रमुख गावडे मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी अनमोल गावडे, महिला बचत गटातील सदस्य, आशा सेविका तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या दृष्टीने वनराई बंधारा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे परिसरातील भूजलपातळी वाढण्यास, विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यास तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सांगेली ग्रामस्थांनी एकजुटीचे दर्शन घडविले आहे. शासनाच्या योजनांसोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहिल्यास गावागावांत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकसहभागातून उभारलेला हा वनराई बंधारा म्हणजे केवळ पाणी अडविण्याचा उपक्रम नसून, सांगेलीच्या भविष्यातील जलसुरक्षेचा भक्कम पाया ठरणार आहे.



