शब्दांच्या लेखणीतून उमटला प्रतिभेचा ठसा!, कवी दीपक पटेकर (दीपी) यांचा ‘सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन’ पुरस्काराने गौरव! ; मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या चतुर्थ साहित्य संमेलनात मानाचा सन्मान; ‘अंतरीचे बोल’ या ललित लेखमालेतील लेखनाची विशेष दखल.

सावंतवाडी : शब्दांना भावनांचे कोंदण, विचारांना साहित्यिक सौंदर्य आणि लेखणीला संवेदनशीलतेची धार लाभली की साहित्य वाचकांच्या मनाचा ठाव घेते. आपल्या ललित लेखनातून वाचकांच्या अंतर्मनाशी संवाद साधणारे सावंतवाडीतील लेखक-कवी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने साहित्यविश्वात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई येथील मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान (रजि.) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन (गद्य)’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या साहित्यिक प्रवासातील हा सन्मान म्हणजे शब्दसाधनेला मिळालेली कौतुकाची थाप आणि सर्जनशील प्रतिभेचा यथोचित गौरव ठरला आहे.

मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चतुर्थ साहित्य संमेलन शनिवारी, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी ठाणे येथील रोटरी क्लब हॉल, नौपाडा येथे साहित्यिक वातावरणात उत्साहपूर्ण रीतीने पार पडले. या संमेलनात संस्थेच्या अध्यक्षा मानसी पंडित यांच्या हस्ते दीपक पटेकर यांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

‘अंतरीचे बोल’ या सदराखाली पटेकर यांनी साकारलेल्या ललित लेखनातून मानवी भावविश्व, विचारांची खोली आणि जीवनानुभवांचे प्रतिबिंब उमटले. शब्दांच्या माध्यमातून मनातील भावभावनांना वाट करून देणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या लेखणीतील संवेदनशीलता, आशयपूर्ण मांडणी आणि वाचकांशी संवाद साधण्याची हातोटी यांना या सन्मानामुळे विशेष अधोरेखित करण्याची संधी मिळाली आहे.

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गझलकार डॉ. सुधाकर गर्दे होते, तर उद्घाटक म्हणून गझलकार डॉ. राजेंद्र केगार उपस्थित होते. कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुभाष कटकदौंड, स्वागताध्यक्ष दीपाली घाटगे, अमृता गोडबोले, गझलकार किरण वेताळ यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ साहित्यिकांच्या सहवासात रंगलेल्या या संमेलनाने मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांना एकत्र आणत साहित्यप्रेमींना समृद्ध करणारा अनुभव दिला.

सात वर्षांची साहित्यसेवा;, नवोदित आणि अनुभवी साहित्यिकांना प्रेरणेचे व्यासपीठ!

मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान ही गेली सात वर्षे मराठी साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था आहे. साहित्यिकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, नव्या लेखणीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीचा गौरव करणे, या उद्देशाने संस्था वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करते. स्तंभलेखनातील पद्य व गद्य विभागांसह विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.

यंदाही महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यभरातून शंभरहून अधिक साहित्यिकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली. त्यामुळे हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता साहित्यिक विचारांची देवाणघेवाण, परस्पर संवाद आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरला.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्षा मानसी पंडित, निखिल कोलते, प्रमोद कोलते, मनाली पंडित, किरण वेताळ, कवयित्री डॉ. मानसी पंडित, राजेश नागुलवार, विनिता कदम, पल्लवी भागवत, योगिता तकतराव यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

सावंतवाडीच्या साहित्यिक शिरपेचात मानाचा तुरा!

दीपक पटेकर (दीपी) यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक वाटचालीला नवी ऊर्जा देणारा असून, त्यांच्या लेखणीतील सर्जनशीलतेला मिळालेली महत्त्वपूर्ण दाद आहे. शब्दांच्या माध्यमातून मनाचा ठाव घेणाऱ्या त्यांच्या लेखनाचा झालेला हा गौरव सावंतवाडीच्या साहित्यिक वर्तुळासाठीही आनंदाची बाब ठरला आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्यप्रेमी आणि वाचकवर्गातून अभिनंदन व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles