संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांचा साहित्यिक जागर!, ‘संत शिरोमणी’ निबंध स्पर्धेत दिव्यल गावडे याची ज्ञानगौरवाला अव्वल गवसणी! ; कोमसाप सावंतवाडी शाखेच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर, दूर्वा नाईक द्वितीय, वेदिका पंडित यांनी पटकावला तृतीय क्रमांक.

सावंतवाडी : संतवाङ्मयाचा समृद्ध वारसा, मराठी भाषेचे वैभव आणि संतविचारांची प्रेरणा नव्या पिढीच्या मनामनांत रुजविण्याच्या उदात्त हेतूने कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संत शिरोमणी’ निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथील दिव्यल दिनेश गावडे याने प्रथम क्रमांक पटकावत आपल्या लेखणीच्या सामर्थ्याची मोहोर उमटवली.

मराठी भाषेचे आद्यप्रवर्तक आणि महान संतपरंपरेतील तेजस्वी रत्न संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५१ व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी तालुक्यापुरती मर्यादित असलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, त्यांचे साहित्यिक योगदान आणि आध्यात्मिक वारसा यांचा अभ्यासपूर्ण वेध घेत विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून विचारांचे सुंदर विश्व उलगडले.

या स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथील दिव्यल दिनेश गावडे याने प्रथम क्रमांक मिळविला. याच विद्यालयातील दूर्वा वासुदेव नाईक हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कास नं. १ येथील वेदिका कृष्णा पंडित हिने तृतीय क्रमांक मिळवून यशाची मोहोर उमटवली.

उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी :

  • रिया सचिन चव्हाण – मिलाग्रीस हायस्कूल
  • श्रेयस हेमंत रेडकर – मदर क्वीन्स हायस्कूल
  • जिज्ञेशा कमलेश भैरे – माध्यमिक विद्यालय, नेमळे

या स्पर्धेचे परीक्षण मालवण येथील कोमसाप सदस्या तथा शिक्षिका श्रीमती आदिती मसुरकर यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, चिंतन आणि अभिव्यक्तीची आवड निर्माण व्हावी, संतसाहित्याच्या माध्यमातून जीवनमूल्यांची पेरणी व्हावी आणि मराठी भाषेची अभिजात परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या दृष्टीने कोमसाप सावंतवाडी शाखेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.

दरम्यान, या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय ‘तुतारी कविसंमेलना’त संपन्न होणार आहे, अशी माहिती शाखाध्यक्ष दीपक पटेकर यांनी दिली.

या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच सहभागी स्पर्धकांचे कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या साहित्यिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles