जनहिताच्या लढ्याला सन्मानाची झळाळी! – माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव! कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून विशेष सन्मान. ; माहिती अधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची घेतली दखल!

सावंतवाडी : जनतेच्या हक्कांसाठी लेखणीला धार देत, प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी सातत्याने संघर्षशील भूमिका बजावणारे सावंतवाडीतील माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांच्या विधायक कार्याचा आज सन्मानाच्या सुवर्णक्षणांनी गौरव करण्यात आला. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित कोकण खरेदी महोत्सवाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात सुशिल चौगुले यांना त्यांच्या माहिती अधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीच्या बळावर प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून देणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी न डगमगता आवाज उठविणे, अशा विविध माध्यमांतून सुशिल चौगुले यांनी आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली आहे. माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या पुढाकारातून आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सुशिल चौगुले यांना शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाचे कौतुक करण्यात आले तसेच पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

दरम्यान, जनहितासाठी निष्ठेने झटणाऱ्या आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकशाहीतील उत्तरदायित्वाची जाणीव जिवंत ठेवणाऱ्या सुशिल चौगुले यांना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी निस्वार्थपणे लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रयत्नांना मिळालेली प्रेरणेची पावती ठरली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles