गोव्याची दारू, आंध्रप्रदेशचे तस्कर अन् सातार्डा चेकपोस्टवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! गोवा बनावटीची दारू अन् आयशर टेम्पोसह तब्बल ६२ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी : गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सातार्डा चेकपोस्ट येथे तब्बल ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या कारवाईत एकूण ६२ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील तीन आणि आरोस येथील एका अशा चौघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या पोलीस माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास सातार्डा चेकपोस्ट येथे पोलिसांनी आयशर टेम्पो क्रमांक AP-39-WF-2121 तपासणीसाठी घेतला. या वाहनाच्या पाठीमागील हौद्यात गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान ‘रॉयल ब्ल्यू व्हिस्की’ असे लेबल असलेल्या १८० मिली क्षमतेच्या प्लास्टिकच्या कंपनी सीलबंद बाटल्यांचे तब्बल ५९७ बॉक्स आढळले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या असून, एकूण २८ हजार ६५६ दारूच्या बाटल्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला.

या दारूसाठ्याची किंमत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या चॉकलेटी रंगाच्या आयशर टेम्पोची किंमत २० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी भास्करप्रदीप रामाराव त्रिमलशेटी (वय ३७), व्यंकटनागरान गोपाळकृष्ण बालम (वय ४०), बॉबी पडाला (रा. आंध्रप्रदेश) आणि निरंजन आनंद नाईक (रा. आरोस) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ), ६५(ई), ८१ आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पहिला आणि दुसरा आरोपी आयशर टेम्पोमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत असताना आढळून आले. तर तिसरा आणि चौथा आरोपी यांच्याशी संगनमत करून ही वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोव्याहून सातार्डा-मळेवाडच्या दिशेने हा दारूसाठा नेण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात ३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५२ वाजता गुन्हा क्रमांक २९८/२०२६ नोंदविण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल राहुल बंडोपंत बरगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे पुढील तपास करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टाकेकर यांनी सहभाग घेतला.

दारू तस्करीच्या साखळीचा शोध लागणार?

सातार्डा चेकपोस्टवर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा नेमका कुठे पोहोचविण्यात येणार होता? या वाहतुकीमागे आणखी कोणाचे हात आहेत? या तस्करीचे जाळे किती दूरवर पसरले आहे? याचा उलगडा आता पोलीस तपासातून होण्याची अपेक्षा आहे. सीमावर्ती भागातील अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तस्करांच्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles