बापरे! – चक्क सीसीटीव्ही कॅमेरे गायब! – सुरक्षेच्या यंत्रणेलाच लागली घरघर! ; लाखोंचा शासकीय निधी खर्चून उभारलेली यंत्रणा धूळखात की भुरट्या चोरट्यांच्या हाती? ; सातुळी फाटा, साटम महाराज मंदिर अन् केसरी फाट्यावरील कॅमेरे बेपत्ता! ; जबाबदारी निश्चित करून आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची दाणोली ग्रामस्थांची जोरदार मागणी!

त्रिविक्रम सावंत.

दाणोली : गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासाला तांत्रिक बळ देण्यासाठी उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाच आज दाणोली परिसरातून गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा वार्षिक निधीतून २०२०-२१ मध्ये लाखो रुपये खर्च करून सातुळी फाटा, श्री साटम महाराज समाधी मंदिर आणि केसरी फाटा अशा महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आज दिसेनासे झाले आहेत. कुठे केवळ खांब उभे आहेत, तर कुठे वायर कापलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ‘गुन्हेगारांवर नजर ठेवणारे कॅमेरेच गायब झाले, मग या सुरक्षेची रखवाली कोण करणार?’ असा संतप्त सवाल दाणोली दशक्रोशीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शासकीय निधीतून मोठ्या अपेक्षेने उभारण्यात आलेली ही यंत्रणा आज अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहे. सातुळी फाटा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेला खांब अद्याप उभा असला, तरी त्यावरील कॅमेरे गायब आहेत. श्री साटम महाराज समाधी मंदिर परिसरात सीसीटीव्हीचा स्टोरेज बॉक्स अस्तित्वात असला, तरी त्याला जोडणाऱ्या वायर कापलेल्या अवस्थेत आहेत. मंदिर परिसरातील कॅमेरेही दिसेनासे झाले आहेत. तर केसरी फाटा येथे कॅमेऱ्यांसह संपूर्ण खांबच गायब झाल्याचे चित्र आहे. एकेकाळी परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणारी ही यंत्रणा आता केवळ आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागे ठेवून गेली आहे.

विशेष म्हणजे, साटम महाराज समाधी मंदिर परिसरातील स्टोरेज बॉक्सवर महाराष्ट्र पोलिसांचे स्टीकर लावलेले आहे. त्यामुळे या यंत्रणेची देखभाल आणि सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस विभागाकडे होती का? यासाठी स्वतंत्र यंत्रणा किंवा संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही यंत्रणा नेमकी कधी बंद पडली? कॅमेरे कोणी काढले? ते चोरीला गेले की अन्य कारणाने हटविण्यात आले? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात दाणोली दशक्रोशीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. या घटनांचा छडा लावण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत चोरट्यांचा माग काढला आहे. मात्र, गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक होते, त्याच ठिकाणची शासकीय यंत्रणा बंद अथवा गायब असल्याने पोलिसांच्या तपासापुढेही अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, खासगी आस्थापना आणि नागरिकांच्या घरांवरील सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहण्याची वेळ पोलिसांवर येत आहे.

संकेश्वर-वेंगुर्ला महामार्गावर वाहनांची अहोरात्र वर्दळ!

संकेश्वर-वेंगुर्ला हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने या मार्गावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्याचप्रमाणे देवसू-नागझरीमार्गे कलंबिस्तकडे जाणाऱ्या जिल्हा मार्गावरही वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गांवरील प्रमुख चौक, फाटे आणि संवेदनशील ठिकाणी आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असणे ही काळाची गरज आहे. चोरी, अपघात अथवा अन्य गुन्हेगारी घटना घडल्यानंतर संशयित वाहने, व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. मात्र, कॅमेरेच गायब झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

लाखोंचा निधी खर्च झाला; मग जबाबदारीचा हिशेब कोण देणार?

सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली शासकीय तिजोरीतून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली यंत्रणा अशा प्रकारे निष्क्रिय अथवा गायब होणे ही गंभीर बाब आहे. या यंत्रणेच्या देखभालीसाठी कोणती तरतूद होती? कॅमेरे बंद पडल्याची माहिती संबंधित विभागाला होती का? कॅमेरे काढण्यात आले असतील तर कोणाच्या आदेशाने? चोरी झाली असल्यास त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे का? तसेच या यंत्रणेवर खर्च झालेल्या निधीचा आणि तिच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार कोण? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सीसीटीव्ही यंत्रणा गायब होण्यामागील नेमके सत्य उजेडात आणावे. या प्रकरणात निष्काळजीपणा अथवा अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच सातुळी फाटा, श्री साटम महाराज समाधी मंदिर आणि केसरी फाटा येथे नव्याने आधुनिक, उच्च दर्जाची सीसीटीव्ही यंत्रणा बसवून ती नियमितपणे कार्यान्वित ठेवावी, अशी मागणी दाणोली दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे केवळ एक तांत्रिक बाब म्हणून न पाहता जनतेच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर विषय म्हणून लक्ष घालावे आणि पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाकडे ठोस पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कॅमेरे गायब होण्याचे गूढ उकलणार कधी? आणि जनतेच्या सुरक्षेचा हा प्रश्न मार्गी लावणार कोण? आता दाणोलीकरांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles