सावंतवाडीच्या सांस्कृतिक वैभवाला पुन्हा लाभणार पर्यटन महोत्सवाचा झगमगाट! – तीन दिवस रंगणार कला-संस्कृतीचा उत्सव! : उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची घोषणा. ; स्थानिक कलाकारांसाठी एक दिवस राखीव.

सावंतवाडी: सावंतवाडीच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी देण्यासाठी आणि स्थानिक कलावंतांच्या सुप्त गुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बंद पडलेला सावंतवाडी नगर परिषदेचा पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा नव्या दिमाखात सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अथवा नववर्षातील जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातील एक संपूर्ण दिवस सावंतवाडीच्या स्थानिक कलाकारांच्या कला-अविष्कारासाठी समर्पित असेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली. त्यांच्या या घोषणेमुळे शहरातील कलाप्रेमी आणि कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने ‘मराठी रंगभूमी दिना’चे औचित्य साधून शहरातील वटसावित्री कला क्रीडा मंडळाच्या व्यासपीठावर नाट्यकर्मींच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शविताना ॲड. निरवडेकर यांनी ही घोषणा केली.

यावेळी बोलताना त्यांनी सम्राट क्लबच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. कला, संस्कृती आणि नाट्यपरंपरेचा वारसा केवळ जपणे नव्हे, तर तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. सम्राट क्लबसारख्या संस्थांनी सुरू ठेवलेला हा सांस्कृतिक जागर असाच अखंडितपणे सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

८० वर्षांची सांस्कृतिक परंपरा; नाट्यकर्मींच्या योगदानाचा गौरव!

सावंतवाडीतील वटसावित्री कला क्रीडा मंडळ गेली तब्बल ८० वर्षे सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहे. या संस्थेच्या माध्यमातून स्थानिक रंगभूमीला नवी ऊर्जा देण्याचे मोलाचे कार्य झाले आहे. माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी नाट्य क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

तसेच सन १९५३ पासून नाट्य क्षेत्रात प्रदीर्घ काळ योगदान देणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी व दिग्दर्शक शंभू पावसकर आणि जनार्दन पोकळे यांच्या कलासाधनेचाही गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा सन्मान म्हणून उमाकांत वारंग आणि कल्पना बांदेकर यांना उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कलावंतांचा सन्मान म्हणजे संस्कृतीच्या मुळांना अभिवादन!

या सोहळ्याला नगरसेविका स्नेहा नाईक, सामाजिक कार्यकर्त्या संजना परब, सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, सचिव प्रतिभा चव्हाण, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, मालवणी कवी दादा मडकईकर, कौस्तुभ पेडणेकर, डॉ. सोनल लेले, स्मिता केंकरे आणि ॲड. सिद्धी परब आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका स्नेहा नाईक यांनीही सम्राट क्लबच्या सांस्कृतिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस यांनी केले, तर कौस्तुभ पेडणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पर्यटन महोत्सवाच्या पुनरागमनाने सावंतवाडीच्या सांस्कृतिक विश्वात पुन्हा एकदा उत्सवाचे रंग भरले जाणार असून, स्थानिक कलावंतांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळण्यासोबतच शहराच्या पर्यटनवैभवाला नवी झळाळी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles