भाजपा राज्य युवा नेते विशाल परब पुरस्कृत नरकासुर स्पर्धेत नरकासुरांच्या महाकाय प्रतिकृतींनी सावंतवाडी दुमदुमली! ; लोटला हजारोंचा महासागर! ; दळवीवाडा-माजगाव मंडळाने पटकावला मानाचा पहिला क्रमांक!

✍️रूपेश पाटील.

– मध्यरात्री तलावाकाठी रंगला नरकासुरांचा थरारक महासंग्राम; ४० हून अधिक मंडळांचा सहभाग, कलात्मकता अन् उत्साहाची अविस्मरणीय पर्वणी!

सावंतवाडी : दीपोत्सवाच्या मांगल्याला उत्साहाची झळाळी आणि नरकासुरांच्या कलात्मक प्रतिकृतींना स्पर्धेची रंगत लाभल्याने सावंतवाडीनगरी अक्षरशः जल्लोषात न्हाऊन निघाली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य नरकासुर स्पर्धेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. हजारो सावंतवाडीकरांच्या उपस्थितीत तलावाकाठी मध्यरात्री रंगलेल्या या नेत्रदीपक स्पर्धेने उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचवला. मोठ्या आणि लहान अशा दोन गटांत पार पडलेल्या या स्पर्धेत ४० हून अधिक नरकासुरांच्या प्रतिकृतींनी आपली कलात्मकता, भव्यता आणि कल्पकतेची चुणूक दाखवली. मोठ्या गटात दळवीवाडा-माजगाव मंडळाने आपल्या नरकासुराच्या आकर्षक प्रतिकृतीच्या जोरावर प्रथम क्रमांकाचा मान पटकावत विजेतेपदावर नाव कोरले.

स्पर्धेच्या निमित्ताने सावंतवाडीच्या विविध भागांतील मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. प्रत्येक मंडळाने आपल्या नरकासुराच्या प्रतिकृतीतून कलात्मकता, मेहनत आणि सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार सादर केला. त्यामुळे परीक्षकांसमोरही निकाल निश्चित करताना मोठी चुरस निर्माण झाली होती.

मोठ्या गटात दळवीवाडा-माजगावची बाजी!

मोठ्या गटात दळवीवाडा-माजगाव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. चौघुलेश्वर हौशी मंडळ, केरवाडा-शिरोडा यांनी द्वितीय क्रमांक, तर बाळ गोपाळ मित्रमंडळ आणि पिंपळेश्वर माऊली यांनी तृतीय क्रमांकाचा मान मिळवला. माठेवाडा आत्मेश्वर मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या मंडळांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

लहान गटातही रंगली अटीतटीची लढत!

लहान गटातील स्पर्धेतही मंडळांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. वटसावित्री कला-क्रीडा मंडळाने उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. झिंगारो बॉईज, उभाबाजार यांनी द्वितीय, तर बाळ गोपाळ मित्रमंडळ, उभाबाजार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. युनिक बॉईज, सालईवाडा आणि झपाटा मित्रमंडळ, सबनीसवाडा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती; स्पर्धेच्या उत्साहात भर!

या भव्य स्पर्धेच्या वेळी भाजपा युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपा नेते विनोद राऊळ, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, जितेंद्र गावंकर, सुकन्या टोपले, सुनीता पेडणेकर, विनेश तावडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेचे परीक्षण राजेश आजगावकर आणि उदय राऊत यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

नरकासुरांच्या भव्य प्रतिकृती, तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग, मंडळांची कलात्मकता आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीने सावंतवाडीतील हा दीपोत्सवी सोहळा संस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या निमित्ताने केवळ पारितोषिकांची चुरस रंगली नाही, तर सावंतवाडीच्या सांस्कृतिक परंपरेला आणि सार्वजनिक उत्सवांच्या एकजुटीला नवी झळाळी मिळाली!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles