✍️रूपेश पाटील.
सावंतवाडी : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव… आनंदाचा सोहळा… नात्यांमधील गोडवा आणि मांगल्याची उधळण! अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा आणि निराशेवर आशेचा विजय साजरा करणारा हा दीपोत्सव. मात्र, याच उत्सवाच्या नावाखाली निसर्गाच्या सौंदर्याची राखरांगोळी होत असेल, तर या झगमगाटाला उत्सव म्हणायचे की पर्यावरणाच्या मुळावर उठलेला उन्माद, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
सावंतवाडी शहराचे वैभव, शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अक्षरशः जनसागर लोटला होता. युवक-युवतींची मोठी गर्दी, उत्साहाचे वातावरण आणि दिवाळीच्या आनंदाला उधाण आलेले चित्र दिसत होते. मात्र, या आनंदोत्सवाला फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीने प्रदूषणाची काळी किनार लाभली. तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. आकाशात धुराचे लोट पसरले, आवाजाच्या गजराने परिसर दुमदुमला आणि दिवाळीचा आनंद प्रदूषणाच्या विळख्यात अडकला.
मात्र, या सगळ्याचा खरा विदारक चेहरा दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आला!

नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी मोती तलाव परिसरात गेलेल्या नागरिकांना निसर्गसौंदर्याचे प्रसन्न दर्शन होण्याऐवजी अस्वच्छतेचे विदारक चित्र पाहायला मिळाले. तलावाच्या काठावर सर्वत्र फटाक्यांचे अवशेष, कागदाचे तुकडे, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचा खच पडलेला होता. काल रात्री ज्या परिसरात आनंदाची आतषबाजी झाली, त्याच परिसरात आज सकाळी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. ज्या मोती तलावाच्या सौंदर्याचा अभिमान आपण मिरवतो, त्याच तलावाच्या काठावर आपणच घाणीचे साम्राज्य निर्माण करतो, ही बाब खरोखरच मनाला वेदना देणारी आहे.
दिवाळी साजरी करताना आपल्या आनंदाची किंमत निसर्गाला का मोजावी लागावी?
फटाके फोडण्याच्या आनंदात हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न आपण किती सहज विसरतो? दिवाळीचा उत्साह साजरा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मोती तलाव हा कोणाच्या खासगी मालकीचा परिसर नाही. तो सावंतवाडीच्या सामूहिक अस्मितेचा, सौंदर्याचा आणि पुढील पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याजोगा ठेवा आहे. त्याचे जतन करणे ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
विशेषतः युवकांनी या बाबतीत अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. आधुनिकतेच्या गप्पा मारताना पर्यावरणाविषयीची जाणीवही आधुनिक असली पाहिजे. सोशल मीडियावर स्वच्छ सावंतवाडीचे फोटो टाकण्यापेक्षा प्रत्यक्षात स्वच्छ सावंतवाडी घडविण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. उत्सवाचा आनंद दुसऱ्यांच्या आरोग्याला आणि शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणारा नसावा.
नगरपरिषद प्रशासनाने आता तरी जागे होणार की नाही?
दरवर्षी सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रकार घडत असतील, तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत? मोती तलावासारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या परिसरात सणांच्या दिवशी विशेष स्वच्छता व्यवस्था, कचरापेट्यांची उपलब्धता, फटाक्यांच्या अवशेषांची तातडीने विल्हेवाट आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठोस मोहीम राबविणे आवश्यक नाही का?
नगरपरिषदेने केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी कचरा उचलण्यापुरती जबाबदारी मर्यादित न ठेवता, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांच्या वापराबाबत आवश्यक नियमांची अंमलबजावणी, पर्यावरणपूरक उत्सवांना प्रोत्साहन आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत योग्य कारवाई यावरही गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
शेवटी एकच प्रश्न…
आपण दिवाळीत घराघरांत दिवे लावतो; पण शहराच्या वैभवावर मात्र प्रदूषणाचा अंधार का पसरवतो?
मोती तलावाच्या पाण्यात शहराचे प्रतिबिंब दिसते, त्या पाण्यात आपल्या संस्कृतीचे आणि संवेदनशीलतेचेही प्रतिबिंब उमटले पाहिजे. उद्या आपल्या मुलांना आणि पुढील पिढीला आपण कोणता मोती तलाव देणार आहोत? फटाक्यांच्या धुराने झाकोळलेला, कचऱ्याने माखलेला की स्वच्छ, सुंदर आणि निसर्गसमृद्ध?
सावंतवाडीकरांच्या मनात आज एकच अपेक्षा व्यक्त होत आहे… नगरपरिषद प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन मोती तलावाच्या स्वच्छतेसाठी आणि शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही ठोस पावले उचलणार आहे की नाही?
प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता कृतीतून उत्तर द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. कारण दिवाळीचा खरा प्रकाश फटाक्यांच्या धुरात नसतो, तर स्वच्छतेच्या जाणिवेत, निसर्गावरील प्रेमात आणि सामाजिक जबाबदारीच्या भानात असतो.
मोती तलाव वाचला, तरच सावंतवाडीचे सौंदर्य टिकेल… अन्यथा दिवाळीचा झगमगाट संपल्यानंतर मागे उरेल तो केवळ प्रदूषणाचा अंधार!, तूर्तास एवढेच..



