सिंधुदुर्गातील २५० युवा नेतृत्वांना मिळणार विविध क्षेत्रातील नेतृत्वाचे धडे!,  ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या पुढाकारातून सावंतवाडीत रंगणार ‘युवा नेतृत्व संसद’. ; भोसले नॉलेज सिटीच्या प्रांगणात आयोजनाचे निश्चित!

सावंतवाडी :  राजकारण म्हणजे केवळ सत्तेची स्पर्धा नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आणि राष्ट्रनिर्मितीचे उत्तरदायी व्यासपीठ आहे. या जाणिवेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा नेतृत्वाला वैचारिक दिशा, राजकीय प्रशिक्षण आणि राष्ट्रसमर्पित नेतृत्वाची नवी ऊर्जा देण्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ (MITSOG) यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘युवा नेतृत्व संसदे’चे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाच्या नियोजनासाठी सावंतवाडी येथे भोसले नॉलेज सिटीचे चेअरमन अच्युत सावंत भोसले यांची भेट घेऊन सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

अंगभूत नेतृत्वक्षमता, सामाजिक जाणिवा आणि राष्ट्रहिताची तळमळ असलेल्या युवकांना राजकीय क्षेत्रात सक्षमपणे वाटचाल करता यावी, तसेच देशाला मूल्याधिष्ठित, अभ्यासू आणि राष्ट्रसमर्पित नेतृत्व लाभावे, या उदात्त हेतूने एमआयटी, पुणे शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या वैचारिक चिंतनातून ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ या अभिनव संकल्पनेचा उदय झाला आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून युवकांना राजकीय व्यवस्थेचे ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव, नेतृत्वकौशल्य आणि लोकसेवेची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच व्यापक ध्येयाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक अशा ३६ ‘युवा नेतृत्व संसदे’ आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा नेतृत्वाची निवड करून त्यांना सक्षम राजकीय प्रशिक्षण देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या उपक्रमासाठी सुमारे २५० युवा नेत्यांना सहभागी करून घेण्याच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी सावंतवाडीचे ख्यातनाम लोकसेवक तथा ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे कोकण व नाशिक प्रांत अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीचे चेअरमन तथा ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे हितचिंतक अच्युत सावंत भोसले यांच्या सहकार्याने ही युवा नेतृत्व संसद आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी ॲड. नकुल पार्सेकर व प्रा. रूपेश पाटील यांनी सावंतवाडी येथे अच्युत सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवा नेतृत्व संसदेच्या आयोजनासंदर्भात विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कार विजेते वक्ते तथा मुख्यमंत्री महामित्र पुरस्कार विजेते पत्रकार प्रा. रुपेश पाटील उपस्थित होते. तसेच ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक श्री. योगेश पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून संवाद साधत या उपक्रमाच्या नियोजनाबाबत आपले विचार मांडले.

दीपावलीनंतर सावंतवाडीत युवा नेतृत्वाचा वैचारिक जागर!

या बैठकीतील चर्चेनंतर दीपावली पर्व संपताच सावंतवाडी येथील ‘भोसले नॉलेज सिटी’च्या प्रांगणात ‘सिंधुदुर्ग जिल्हा – युवा नेतृत्व संसदे’चे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या तरुणांना नेतृत्वविकासाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

युवा शक्तीला केवळ घोषणांचे बळ न देता विचारांचे सामर्थ्य, केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा न देता लोकसेवेची बांधिलकी आणि केवळ नेतृत्वाची स्वप्ने न दाखवता सक्षम नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारा हा उपक्रम ठरणार आहे. कोकणच्या भूमीतून उद्याचे अभ्यासू, कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेतृत्व घडविण्याच्या दिशेने ‘युवा नेतृत्व संसद’ हा निश्चितच एक आश्वासक आणि दिशादर्शक उपक्रम ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles