– माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे स्वप्न साकार! ; ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत, केक कापून विमानसेवेचा जल्लोषात शुभारंभ!
चिपी-सिंधुदुर्ग : कोकणच्या पर्यटन वैभवाला आकाशाची नवी झेप देणारा आणि सिंधुदुर्गच्या विकासाला प्रगतीचे नवे क्षितिज खुलं करणारा ऐतिहासिक क्षण अखेर अवतरला! तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर चिपी-मुंबई विमानसेवेचे आज दिमाखात पुनरागमन झाले. सिंधुदुर्ग विमानतळावरून पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने विमानाचे उड्डाण सुरू झाल्याने जिल्हावासीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पाहिलेले सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
या ऐतिहासिक शुभारंभानिमित्त चिपी विमानतळावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव, औक्षण आणि मिठाईचे वाटप अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुंबईकडे रवाना होणाऱ्या पहिल्या प्रवाशाला त्यांच्या हस्ते बोर्डिंग पास प्रदान करण्यात आला. यावेळी प्रवाशांना शुभेच्छा देताना त्यांनी सुरू झालेली विमानसेवा भविष्यात कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली.
फ्लाय ९१ कंपनीच्या विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आशावादी दृष्टिकोन मांडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साठविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रोहिता तांबे, प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, दीपलक्ष्मी पडते, अबीद नाईक, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, आनंद शिरवलकर, मनोज रावराणे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. नारायण राणेंचे स्वप्न प्रत्यक्षात! – पर्यटन विकासाला नवी दिशा!
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर उज्ज्वल स्थान मिळवावा, येथील तरुण-तरुणींना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची आर्थिक समृद्धी साधली जावी, हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयांशी संपर्क, पत्रव्यवहार आणि केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे विमानसेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला.
चिपी विमानतळ सुरू करण्याचा प्रवास निश्चितच आव्हानात्मक होता. यापूर्वी विमानसेवा सुरू झाली होती; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ती बंद पडली. विमान कंपन्यांना सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली धावपट्टी, वेळेची मर्यादा, रस्ते, जागेची उपलब्धता आणि रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याच्या सुविधा अशा विविध बाबींची पूर्तता करणे गरजेचे होते. गेल्या दोन वर्षांत या सुविधांच्या उपलब्धतेसाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे भविष्यात मोठ्या विमान कंपन्यांनाही सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू करणे शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विमानतळ केवळ प्रवासाचे साधन नव्हे, रोजगाराची नवी सुवर्णसंधी!
विमानतळाकडे केवळ प्रवासाची सुविधा म्हणून न पाहता रोजगारनिर्मितीचे प्रभावी केंद्र म्हणून पाहण्याची गरज असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. विमानसेवेमुळे पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल वाढेल. पर्यटकांची संख्या वाढल्याने स्थानिक तरुणांना टुरिस्ट वाहतूक, हॉटेल व्यवसाय, निवास व्यवस्था, पर्यटन मार्गदर्शन आणि विविध पूरक व्यवसायांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या संधींचा लाभ बाहेरील व्यावसायिकांपेक्षा सिंधुदुर्गातील स्थानिक तरुण-तरुणींना मिळाला पाहिजे. पर्यटनाशी संबंधित व्यवसाय स्थानिकांच्या मालकीचे व्हावेत, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शासनाच्या पाठबळामुळे विमानसेवेला बळकटी!
लहान शहरांमधील विमानतळांवर विमानसेवा सातत्याने सुरू ठेवण्यासाठी विमान कंपन्यांना शासनाच्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने सिंधुदुर्ग विमानतळासाठी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आभार मानले.
विमानतळासाठीचा विशेष प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडून त्याला मान्यता मिळविण्यात आली. आर्थिक तरतुदीच्या कालमर्यादेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंत्रिमंडळाची पूर्वलक्षी मान्यता मिळवून विमानसेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या जिद्दीला यश; जिल्हावासीयांसाठी ऐतिहासिक दिवस!
आमदार नीलेश राणे यांनी विमानसेवा पुन्हा सुरू होणे हा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले. मुंबई, नवी मुंबई आणि गोव्यातील मोपा विमानतळामुळे निर्माण झालेली स्पर्धा तसेच विविध तांत्रिक अडचणी लक्षात घेता चिपी विमानतळावर पुन्हा विमानसेवा सुरू करणे सोपे नव्हते. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे आव्हान पेलले. त्यामुळे जिल्हावासीयांना आज हा आनंदाचा क्षण अनुभवता येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार दीपक केसरकर यांनीही विमानसेवा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुंबई ही कोकणची महत्त्वाची जोडणी असून, दोन वर्षांच्या खंडानंतर ही सेवा पुन्हा सुरू होणे अत्यंत आनंददायी आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या सेवेमुळे विमान तिकिटाच्या दरात शासनाकडून सुमारे तीन हजार रुपयांचे अनुदान दिले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही विमानप्रवासाचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गच्या विकासाची नवी भरारी!
चिपी-मुंबई विमानसेवेचे पुनरागमन म्हणजे केवळ एका विमानाचे उड्डाण नव्हे, तर सिंधुदुर्गच्या पर्यटन, व्यापार, उद्योग आणि रोजगाराच्या आकांक्षांना मिळालेली नवी दिशा आहे. निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या सिंधुदुर्गला आता देशाच्या आर्थिक राजधानीशी थेट जोडणारा दुवा पुन्हा मजबूत झाला आहे.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली ही हवाई कनेक्टिव्हिटी जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विमानसेवा अखंड सुरू ठेवण्याची शासनाची ग्वाही आणि स्थानिकांनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे केलेले आवाहन यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला खऱ्या अर्थाने आकाशाची नवी उंची मिळण्याची आशा निर्माण झाली आहे!



