सावंतवाडीच्या कन्येची रोलबॉलच्या मैदानातून राष्ट्रीय क्षितिजाकडे झेप! ; मिलाग्रीसच्या विधी मिशाळची महाराष्ट्राच्या U-14 रोलबॉल संघात दिमाखदार निवड. ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरण्याचा मान!

सावंतवाडी : जिद्दीला मेहनतीची जोड आणि स्वप्नांना कर्तृत्वाचे पंख लाभले की यशाची उत्तुंग भरारी निश्चितच असते, याची प्रचिती सावंतवाडीच्या मिलाग्रिस हायस्कूलची गुणवान खेळाडू कुमारी विधि सुनील मिशाळ हिने आपल्या दैदीप्यमान कामगिरीतून करून दिली आहे. विधिची २० व्या सब-ज्युनियर (U-14) महाराष्ट्र रोलबॉल संघातील टॉप १२ खेळाडूंमध्ये निवड झाली असून, तिच्या या निवडीने सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या रोलबॉल संघात स्थान मिळवणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मुलगी होण्याचा ऐतिहासिक बहुमान विधिने संपादन केला आहे. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला तिचा क्रीडाप्रवास आता थेट महाराष्ट्राच्या संघापर्यंत पोहोचला आहे. तिच्या या यशामागे असलेली अथक मेहनत, प्रचंड जिद्द, खेळाप्रती निष्ठा आणि सातत्यपूर्ण सराव यांचे हे फलित आहे.

रोलबॉलच्या मैदानावर आपल्या चपळाईने, अचूक खेळाने आणि जिद्दीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणाऱ्या विधिने आपल्या कौशल्याची प्रभावी छाप उमटवली. अनेक खेळाडूंमधून राज्य संघाच्या टॉप १२ मध्ये स्थान मिळवणे ही निश्चितच उल्लेखनीय कामगिरी असून, तिच्या कर्तृत्वाने जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंसमोर प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व!

आता विधि महाराष्ट्राच्या संघाकडून राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या २७ ते ३० डिसेंबर २०२६ या कालावधीत मेघालय येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक उंचावण्याची सुवर्णसंधी तिला लाभली आहे.

मार्गदर्शकांच्या संस्कारातून यशाची भरारी!

विधिच्या या यशस्वी वाटचालीत तिचे मार्गदर्शक श्री. सागर सावंत, मिलाग्रिस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा, क्रीडाशिक्षक श्री. हितेश मालंडकर आणि शेरॉन अल्फोन्सो यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. शाळेतील क्रीडापूरक वातावरण, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि विधिची स्वतःची मेहनत यामुळेच तिच्या गुणवत्तेला राज्यस्तरावर झळाळी मिळाली.

विधिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा आणि पर्यवेक्षिका सौ. संध्या मुणगेकर यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

एका छोट्याशा परिसरातून सुरू झालेला प्रवास आज राष्ट्रीय क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे. विधिचे हे यश केवळ एका खेळाडूचे यश नसून, जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रासाठी नवी आशा, नवी प्रेरणा आणि अभिमानाची नवी ओळख आहे.

राष्ट्रीय स्पर्धेतही आपल्या खेळाची चमक दाखवत यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करावीत आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवावा, यासाठी राष्ट्रीय क्षितिजाकडे झेपावणाऱ्या विधि मिशाळ हिला मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles