वैभववाडी : ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क, अधिकार आणि कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण होणे ही काळाची अनिवार्य गरज आहे. ग्राहकांचे होणारे शोषण रोखून सजग, सक्षम आणि शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने २४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ‘जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या लेखणीतून ग्राहक जागृतीचा विचार समाजापर्यंत पोहोचणार आहे.
ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असला, तरी अनेकदा माहितीच्या अभावामुळे त्याला आपल्या हक्कांपासून वंचित राहावे लागते. फसवणूक, दिशाभूल, निकृष्ट सेवा आणि आर्थिक शोषण अशा विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती जनमानसापर्यंत पोहोचविणे, ग्राहक चळवळीला बळकटी देणे आणि नव्या पिढीमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.
या स्पर्धेला बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा वैभववाडी आणि पोलीस ठाणे, वैभववाडी यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धा तीन स्वतंत्र गटांत आयोजित करण्यात आली असून त्यासाठी पुढील विषय निश्चित करण्यात आले आहेत.
प्रथम गट – कनिष्ठ महाविद्यालयीन गट (इयत्ता ११ वी व १२ वी) विषय : ग्राहक संरक्षण ही काळाची गरज. शब्दमर्यादा : ४०० ते ५०० शब्द.
द्वितीय गट – महाविद्यालयीन गट विषय : डिजिटल युगातील ग्राहक संरक्षण : समस्या, आव्हाने आणि उपाययोजना. शब्दमर्यादा : ५०० ते ६०० शब्द.
तृतीय गट – खुला गट विषय : विकसित भारताच्या निर्मितीत जागृत ग्राहकांचे योगदान. शब्दमर्यादा : ६०० ते ७०० शब्द.
स्पर्धकांनी संबंधित विषयाला अनुसरून आपला निबंध स्वतंत्रपणे फुलस्केप आकाराच्या कागदाच्या एका बाजूला स्वच्छ व सुवाच्य अक्षरात लिहावा. निबंध लेखनासाठी इंटरनेट, पुस्तके अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या साधनांचा वापर केल्यास त्यांचे संदर्भ नमूद करणे आवश्यक आहे. प्राप्त निबंधांची निवड व गुणांकन संस्थेच्या तज्ज्ञ परीक्षकांकडून करण्यात येणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०१ रुपये, ४०१ रुपये आणि ३०१ रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी आपले निबंध १५ डिसेंबर २०२६ पर्यंत अध्यक्ष अथवा सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा, घर क्रमांक ५४४, मु. पो. ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग – ४१६ ८१० या पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील (९८३४९८४४११), संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी (९८६९८५४५२३) आणि सचिव श्री. संदेश तुळसणकर (९४२०१००९४६) यांच्याशी संपर्क साधावा.
ग्राहकांचे हक्क जाणून घेणारी लेखणी, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी विचारशक्ती आणि सजग नागरिकत्वाची जाणीव नव्या पिढीत रुजविण्याचा हा उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि सर्व नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ग्राहक जागृतीच्या चळवळीला आपल्या विचारांचे बळ द्यावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.



