इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचा मालवणमध्ये क्रीडोत्साहात श्रीगणेशा! ; दिगंबर सामंत यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन; जिल्ह्यातील युवा खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची सुवर्णसंधी!

मालवण : क्रीडांगणावर रॅकेटचा नजाकतदार स्पर्श, चेंडूचा वेगवान प्रवास आणि विजयासाठी झुंज देणाऱ्या खेळाडूंचा उत्साह… अशा क्रीडामय वातावरणात इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचा मालवणमध्ये दिमाखदार शुभारंभ झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेचा लौकिक प्राप्त केलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने मालवणच्या क्रीडाविश्वात उत्साहाचे नवे चैतन्य संचारले आहे.

महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथील श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये उत्साहात पार पडला. मालवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दिगंबर सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख टेबल टेनिसपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे आणि टेबल टेनिस या खेळाचा जिल्ह्यात व्यापक प्रचार व प्रसार करणे, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या सहकार्याने २०१८ पासून मालवणमध्ये दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, कंपनीच्या क्रीडाप्रेमी सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे.

१४ व १५ नोव्हेंबर २०२६ या दोन दिवसांत रंगणाऱ्या या स्पर्धेत ११ व १३ वर्षांखालील मुले-मुली, १५ व १७ वर्षांखालील मुले-मुली, पुरुष एकेरी, महिला एकेरी तसेच पुरुष-महिला मिश्र दुहेरी अशा विविध गटांत सामने रंगणार आहेत. त्यामुळे बालवयातील खेळाडूंपासून अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांना आपले कौशल्य, चपळाई आणि खेळातील अचूकता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

उद्घाटन समारंभाला मालवण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विजय कामत, विश्वस्त दिगंबर सामंत, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, महासिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर, कोषाध्यक्ष नितीन तळेकर, दिलीप हुनारी, विलास परुळेकर, क्षितिज हुनारी, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे निशाकांत पराडकर यांच्यासह स्पर्धक, पालक आणि टेबल टेनिसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विष्णू कोरगावकर यांनी मानले.

क्रीडा संस्कृतीचा वारसा जपत नव्या पिढीतील खेळाडूंना घडविण्याचे कार्य ही स्पर्धा सातत्याने करीत आहे. इंडियन ऑइलच्या पाठबळातून आणि स्थानिक क्रीडा संस्थांच्या पुढाकारातून मालवणच्या भूमीत रंगणारा हा टेबल टेनिसचा थरार जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles