बालदिनाच्या निमित्ताने भोसले स्कूलमध्ये आनंदोत्सवाची रंगत; शिक्षकांच्या कलाविष्काराने विद्यार्थ्यांची मने जिंकली! ; शिक्षकांच्या नृत्याविष्कारापासून समूहगानापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; खेळ, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि रांगोळी स्पर्धेने बालदिन ठरला अविस्मरणीय.

सावंतवाडी : बालपण म्हणजे निरागस हास्याचा झरा, कल्पनांच्या पंखांनी भरारी घेणारे विश्व आणि आनंदाच्या रंगांनी सजलेले सुंदर क्षण! अशाच चैतन्यमय वातावरणात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि कलाविष्काराची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची, विचारांची आणि बालकांविषयी असलेल्या त्यांच्या विशेष प्रेमाची माहिती देण्यात आली. तसेच बालदिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आनंद, सर्जनशीलता आणि कलागुणांना असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला तो शिक्षकांचा कलाविष्कार! प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने विद्यार्थ्यांची मने जिंकली, तर माध्यमिक विभागातील शिक्षकांनी सादर केलेल्या सुरेल समूहगानाने वातावरणात संगीताची मधुर लय निर्माण केली. नेहमी ज्ञानदानात रमणारे शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांसोबत कलेच्या रंगात रंगले, तेव्हा विद्यार्थ्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले.

याशिवाय शाळेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या आणि खेळांच्या स्टॉल्सचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. मित्रमैत्रिणींसोबत खेळ, खाण्याची मजा आणि धमाल-मस्ती यामुळे बालदिनाचा उत्साह द्विगुणित झाला. दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे आणि कलात्मक कौशल्याचे रंगीबेरंगी दर्शन घडविले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळ, स्पर्धा आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाची अविस्मरणीय शिदोरी ठरला. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा हा बालदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ऋतुजा तुळसकर यांनी केले, तर दीपिका कदम यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा अॅड. डॉ. अस्मिता सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles