वेंगुर्ला: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस यांच्या वतीने आयोजित अश्वमेध तुळस महोत्सवानिमित्त सलग १३ व्या वर्षी खुली व शालेय गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
शालेय गटासाठी ‘दुष्काळ : निसर्गाचा कोप की मानवाचा निष्काळजीपणा?’ हा विषय देण्यात आला आहे. दुष्काळाची नैसर्गिक कारणे, बदलते हवामान, पाण्याचा अमर्याद वापर, वृक्षतोड, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि पाणी बचतीची गरज अशा विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येणार आहेत.

खुल्या गटासाठी ‘आपण पुढच्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत?’ हा विषय असून, पर्यावरण संवर्धन, निसर्गसंपत्तीचे जतन, संस्कृती व परंपरांचा वारसा, माणुसकी, सामाजिक मूल्ये आणि भावी पिढीप्रती आजच्या समाजाची जबाबदारी या विषयांवर स्पर्धकांना चिंतनपर लेखन करता येणार आहे.
*पारितोषिकांचे स्वरूप*
*खुला गट :* प्रथम – १,१०० रुपये, द्वितीय – ७७७ रुपये, तृतीय – ५५५ रुपये, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी ३३३ रुपये. सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
*शालेय गट :* प्रथम – १,००० रुपये, द्वितीय – ७०० रुपये, तृतीय – ५०० रुपये, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी २५० रुपये. सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
*स्पर्धेचे नियम व अटी :* निबंध मराठी भाषेत, स्वहस्ताक्षरात व स्वलिखित असावा. खुल्या गटासाठी किमान १,००० शब्द, तर शालेय गटासाठी किमान ५०० शब्दांची मर्यादा आहे. पीडीएफ किंवा टंकलिखित स्वरूपातील निबंध स्वीकारले जाणार नाहीत. निबंध पोस्टाने किंवा प्रत्यक्ष हाती आणून द्यावेत. निबंधासोबत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व गट नमूद करणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. अंतिम मुदतीनंतर प्राप्त निबंधांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.
निबंध पाठविण्याची अंतिम तारीख *२० डिसेंबर २०२६* असून, निबंध वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस, द्वारा डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मुक्काम पोस्ट तुळस, खरीवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, पिन ४१६५१६ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा.
केवळ स्पर्धात्मक यशापुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख विचार, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, माणुसकी आणि भावी पिढीप्रती असलेली जबाबदारी लेखनातून व्यक्त व्हावी, हा या उपक्रमामागील प्रतिष्ठानचा हेतू आहे. अश्वमेध तुळस महोत्सवाच्या माध्यमातून सलग तेरा वर्षे निबंध स्पर्धेचे आयोजन करून वेताळ प्रतिष्ठानने सांस्कृतिक उपक्रमांसोबत वैचारिक प्रबोधनाची परंपरा कायम ठेवली आहे.तरी जास्तीत जास्तीत जास्त स्पर्धकांनी निबंध लेखन स्पर्धेत सहभागी व्हावं असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस कडून करण्यात आले आहे.



