बांदा : दिवाळी म्हणजे मांगल्याचा, आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव! या उत्सवात साहित्याच्या शब्ददीपांची भर घालत वाचनसंस्कृतीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम बांदा येथील नट वाचनालयाने यंदाही हाती घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचनालयाच्या वतीने वाचकांसाठी विशेष दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या योजनेचा मंगलमय प्रारंभ करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, शंकर नार्वेकर, सौ. अर्चना सावंत, मिलिंद महाजन आणि ग्रंथपाल सुस्मिता नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचनाची आवड जोपासणाऱ्या आणि साहित्यविश्वातील वैविध्यपूर्ण लेखनाचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी ही योजना पर्वणीच ठरणार आहे. उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या उदार देणगीतून दरवर्षी ही दिवाळी अंक योजना साकारली जाते. त्यांच्या या साहित्यप्रेमी योगदानामुळे वाचकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी उपलब्ध होत असून, वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाला मोलाचे बळ मिळत आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या १०० रुपये वर्गणीतून वर्षभर दिवाळी अंक वाचकांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अल्प आर्थिक सहभागातून साहित्याचा अमूल्य ठेवा अनुभवण्याची संधी या योजनेमुळे वाचकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन सचिव राकेश केसरकर यांनी केले.
डिजिटल युगाच्या झगमगाटातही पुस्तकांच्या पानांमधील शब्दसंपदा आणि वाचनाचा आनंद जपणारा नट वाचनालयाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. दिवाळीच्या फराळासोबतच ज्ञान, विचार आणि साहित्याचा फराळ वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या योजनेतून बांद्याच्या वाचनसंस्कृतीला नवी झळाळी लाभणार आहे.



