आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुनीत बालन प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आयोजित आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या सहकार्याने विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ५३ व्या सबज्युनिअर (१५ वर्षांखालील मुले व मुली) राज्य ज्यूदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचा आंबोली पब्लिक स्कूल व आंबोली विद्यानिकेतन आंबोली येथे दिमाखदार शुभारंभ झाला.
राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ३०० हून अधिक युवा ज्यूदोपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून, १०० हून अधिक प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व पंचांची उपस्थिती लाभली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन आंबोली पब्लिक स्कूल व आंबोली विद्यानिकेतनचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य विलास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्यूदोचे जागतिक संस्थापक डॉ. जिगोरो कानो आणि भारतीय ज्यूदोचे संस्थापक गुरुवर्य आर. डी. खानिवाले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच शक्तीचे उपासक महाबली हनुमान आणि सद्गुरू गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव दत्ता आफळे, खजिनदार रवींद्र मेटकर, महाराष्ट्र राज्य क्रीडा उपसंचालक चंद्रशेखर साखरे, टूर्नामेंट डायरेक्टर अतुल बामनोदकर, टेक्निकल चेअरमन दर्शना लखानी, टेक्निकल सेक्रेटरी योगेश धाडवे, महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे पदाधिकारी मुकुंद डांगे, वृषाली लिंग्रस, सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, खजिनदार अभिजित शेट्ये, पदाधिकारी चंद्रकांत शिंदे, सोनू जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जमादाडे यांनी केले.

*लखनौ येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची होणार निवड*
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडीची संधी
१५ वर्षांखालील मुले व मुलींसाठी आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धांमधून प्रथम क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. विविध वजनी गटांमध्ये सलग तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील युवा ज्यूदोपटूंसाठी ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
*सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक पर्व*
ज्यूदो या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा प्रकाराची राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित झाल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात राज्यभरातील उदयोन्मुख ज्यूदोपटूंच्या कौशल्याचा आणि क्रीडासामर्थ्याचा आविष्कार अनुभवण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्याच्या क्रीडा नकाशावरील ओळख अधिक ठळक होणार आहे.
*यवतमाळ,धुळे,लातूर,रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी शनिवारचा दिवस गाजवला!*
*30कि.ग्रॅ.वजन*
प्रथम-विराज चव्हाण (यवतमाळ ) द्वितीय -स्वराज सरनाईक (नागपूर )तृतीय-पार्थ पाटील (कोल्हापूर), श्रेयस सोळंके (छ.सभाजीनगर)
*35कि.ग्रॅ.वजन*
प्रथम-यश पगारे (धुळे ),द्वितीय -स्वराज सुरवसे (बीड )तृतीय-वंश वराडे (नाशिक), वेदांत दुरबुडे (वर्धा)
*40कि.ग्रॅ.वजन*
प्रथम-वेदांत पारधी (यवतमाळ ) द्वितीय -प्रतिक कुशवाह (अमरावती)तृतीय-चिन्मय दाभोळे (वर्धा), प्रतीक चव्हाण (पी डी जे ए)
*45कि.ग्रॅ.वजन*
प्रथम-प्रिन्स सोनवणे (लातूर ), द्वितीय -प्रज्वल यादव (कोल्हापूर )तृतीय-आरंभ शिंदे(धाराशिव), वेदांत विचारे (मुंबई)
*60कि.ग्रॅ.वजन*
प्रथम-कुशान त्रिवेदी (रायगड ) द्वितीय -भुविक पोजारी (ठाणे )तृतीय-जिजाबा मंगाडे (पीडीजेए), पार्थ रंगारी (अमरावती)
इतर वजनी गटाच्या स्पर्धा रात्रो उशीरपर्यंत सुरू होत्या.तर आज रविवारी मुलींच्या विविध गटातील स्पर्धा संपन्न होणार आहेत.



